आंगणेवाडीचा परिसर होणार सुशोभित ; पालकमंत्र्यांचे जातीनीशी लक्ष

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतला आढावा ; १५ ते २० जानेवारी पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना

आंगणेवाडी कडे जाणाऱ्या नऊ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती ; कामात हयगय करण्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

मालवण | कुणाल मांजरेकर

आंगणेवाडी येथील भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ४ फेब्रुवारीला होत आहे. त्यादृष्टीने आंगणेवाडी मधील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आंगणेवाडीला भेट देऊन अधिकारी आणि ग्रामस्थांसह चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत यात्रेपूर्वी येथील समस्या दूर करण्याचे सक्त आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या नऊ रस्त्यांच्या कामांना पालकमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. ही सर्व कामे १५ ते २० जानेवारी पर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत, असे पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्याचे राजन तेली यांनी सांगितले. ज्या अधिकाऱ्यांनी हयगय केली, त्यांच्यावर पालकमंत्र्यांकडून कारवाई देखील करण्यात आली आहे, असेही श्री. तेली यांनी स्पष्ट केले.

आंगणेवाडी मधील श्री भराडी देवीच्या मंदिरात राजन तेली यांनी आंगणे कुटुंबिय आणि सार्वजनिक बांधकाम भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भास्कर आंगणे, आनंद आंगणे, काका आंगणे, नारायण आंगणे, भरत आंगणे, बाबू आंगणे, बाप्या आंगणे, मधुकर आंगणे, गणेश आंगणे, नंदू आंगणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील, प्रदीप पाटील, उदय पाटील तसेच अन्य ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर परिसरातील रस्ते, विजेची कामे यात्रेच्या १५ दिवस अगोदर करण्यात यावी, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. तसेच शौचालयाचा प्रश्न देखील मार्गी लावण्याची सूचना त्यांनी केली. आंगणेवाडी गावात नेटवर्कचा प्रश्न जाणवत असून येथे जिओ टॉवर बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या अनुषंगाने राजन तेली यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून याबाबत पाठपुरावा करू असे सांगितले. रस्त्याची कामे देखील यात्रेपूर्वी पूर्ण केली जातील. या कामांमध्ये हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याचे राजन तेली यांनी सांगितले.

येथील ग्रामस्थानी पालकमंत्र्यांकडे विकास कामांसंदर्भात काही मागण्या केल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी आंगणेवाडीत बैठक घेऊन याठिकाणी जोडणारे नऊ रस्ते तातडीने हाती घेण्यात यावेत, अशी सूचना केली होती. या नऊ रस्त्यांची टेंडर काढून काही ठिकाणी कामाना सुरुवात झाली. तर उर्वरित कामे २० जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. भाविकांना चांगल्या प्रकारचे शौचालय उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. दोन कोटी रुपये खर्च करून सुसज्ज शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंगणेवाडीत भुयारी वीज वाहिनी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात्रेनंतर ही कामे केली जातील, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!