वायरी भूतनाथ मध्ये भाजपची अवस्था म्हणजे “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” !
शिवसेना ठाकरे गटाचा टोला ; उपसरपंच निवडणुकीत भाजपावर स्वतःची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की
मालवण | कुणाल मांजरेकर
वायरी भूतनाथ मध्ये शिवसेनेचा उपसरपंच न होण्यासाठी भाजपने अनेक षडयंत्र आखली. तरीपण भाजपला उपसरपंच पद मिळवता आले नाही. शिवसेना असो अगर काँग्रेस, आम्ही या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो होतो. त्यामुळे भाजपाच्या अनेक षडयंत्रा नंतरही शेवटी या ग्रा. पं. मध्ये महाविकास आघाडीचाच उपसरपंच बसला आहे. भाजपवर उपसरपंच निवडणुकीत स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विजयानंतर भाजपने केलेले सेलिब्रेशन म्हणजे “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” असा प्रकार असल्याची बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रवीण लुडबे यांनी केली आहे.
वायरी भूतनाथ ग्रा. पं. च्या उपसरपंच निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसच्या उमेदवार सौ. प्राची माणगांवकर या भाजपच्या पाठींब्यावर विजयी झाल्या होत्या. यावेळी भाजपने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला होता. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. यावर शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रवीण लुडबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वायरी भूतनाथ निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून मतदारांकडे गेलो होतो. सरपंच पदासह आमचे पाच सदस्य निवडून आले. त्यामुळे ठरलेल्या फॉर्म्युल्या नुसार प्रत्येक सदस्याला एक एक वर्ष उपसरपंच पद देण्याचे निश्चित करण्यात आले. पहिल्या टर्म मध्ये चंदना प्रभू यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र भाजपने षडयंत्र करून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. शिवसेनेचा पराभव करून भाजपने स्वतःचा उपसरपंच बसवला असता तर ठीक होते. पण भाजपावर स्वतःची उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसला पाठींबा दयावा लागला. काँग्रेसचा उपसरपंच बसला असला तरी शेवटी याठिकाणी महाविकास आघाडीचीच सत्ता आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विजयावर भाजपने हुरळून जाऊ नये, असे प्रवीण लुडबे यांनी म्हटले आहे.
राणेंच्या चाकराने खोबरेकरांवर बोलू नये !
हरी खोबरेकर यांनी जिल्ह्यात स्वतःचे नाव कमावले आहे. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख अशी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदे त्यांच्याकडे असून मत्स्य उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे नारायण राणेंचा चाकर म्हणून ओळख असलेल्या भाई मांजरेकर यांनी खोबरेकर यांच्यावर बोलू नये. किनारपट्टीवर शिवसेना किती आली हे विचार करण्या पेक्षा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व त्यांनी शोधावे, असा सल्ला प्रवीण लुडबे यांनी दिला आहे.
चौके, तारकर्लीत भाजपच्या विरोधात मतदान
चौके गावात गावविकास पॅनलची सत्ता आली असली तरी याठिकाणी भाजपच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे. तारकर्ली मध्येही भाजपच्या पाठींब्यावर सरपंच बसलेल्या सौ. केरकर यांच्या विरोधातील नाराजी मतदारांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील मतदारांनी भाजपला नाकारले आहे. गावविकास पॅनलची सत्ता आलेल्या अन्य गावात गावच्या विकासासाठी राजकारण न आणण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या अस्तित्वाची काळजी करू नये. निवडणुकी वेळी येथील मतदार भाजपला आरसा दाखवतील, असा टोला प्रवीण लुडबे यांनी लगावला आहे.