सागरी महामार्गाच्या डागडुजीसाठी रस्त्याची होणारी साफसफाई निदर्शनास येताच युवासेनेची नौटंकी !
भाजयुमोची टीका ; निलेश राणेंच्या हस्ते डांबरीकरणाचा होणार शुभारंभ
नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन युवासेनेला पुढे करून विरोधकांकडून बोंब मारण्याचे प्रकार
युवासेनेने श्रेयवाद आणि प्रसिद्धी साठी काम न करता मालवणच्या विकासासाठी काम करावे
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील देऊळवाडा ते कोळंब सागरी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भारतीय जनता पार्टी आणि भाजयुमोचा गणेश चतुर्थी पासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळेच गणेश चतुर्थी कालावधीत याठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. दिवाळी नंतर पाऊस संपताच हे काम हाती घेण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने दिली होती. त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्फत पाठपुरावा सुरु आहे. त्यानुसार आता सागरी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने रस्त्याची साफसफाई सुरु केली आहे. हे निदर्शनास येताच युवासेनेकडून श्रेय घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्याची नौटंकी करण्यात आली आहे. मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून सत्ताधारी पक्ष मालवण शहराच्या विकास कामांसाठी निधी देत नाहीत, अशी बोंब मारण्याचा प्रयत्न विरोधक युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढे करून करताना दिसत आहेत. त्यामुळे युवासेनेने श्रेयवाद आणि प्रसिद्धीसाठी काम न करता मालवणच्या विकासासाठी काम करावे. काम सुरु होण्यापेक्षा कामाचा दर्जा राखण्यासाठी काम करावे, त्याला भाजपचाही पाठींबा असेल, अशी प्रतिक्रिया भाजयुमोचे वॉर्ड अध्यक्ष निनाद बादेकर यांनी दिली आहे. सागरी महामार्गाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ माजी खा. निलेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सागरी महामार्गाचे डांबरीकरण दोन दिवसात सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेचे शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांनी काल दिला होता. या अनुषंगाने भाजयुमोच्या श्री. बादेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मालवण शहरातील सागरी महामार्ग वरील डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. गणेश चतुर्थी वेळी सागरी महामार्गावरील डागडूजी करण्यात यावी असे निवेदन मालवण नगरपालिकेला व सार्वजनिक बांधकाम खात्याला भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा मार्फत देण्यात आले होते. त्याला अनुसरून तात्पुरते खडे खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले होते. पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे बंद असल्याने डांबरीकरण होऊ शकत नाही कामाची निविदा खात्यामार्फत कार्यान्वित केली आहे. लवकरच प्रथम प्राधान्याने काम करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आश्वासित केले होते. माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती घेतली असता हे काम मार्च मध्येच मंजूर झाले असून प्रभू कन्स्ट्रक्शनने घेतले आहे, अशी माहिती उपलब्ध होता काम का सुरू करत नाही ? म्हणून ठेकेदाराला विचारणा केली असता पाऊस कमी झाला नाही तर दिवाळीनंतर ताबडतोब कामात सुरुवात करतो, असे सांगण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराला काम सुरू करण्याची विनंती करूनही काम सुरू करत नसल्याचे निदर्शनास येता ही बाब भाजपा नेते निलेश राणे यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली. राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा लक्ष वेधला असता ११ डिसेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकामच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून ताबडतोब हे काम मार्गस्थ लावले पाहिजे असे आदेश दिले होते. संबंधित अधिकाऱ्यां कडून ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर ताबडतोब कामात सुरुवात करतो असे सांगण्यात आले होते. त्या अनुसरून २६ डिसेंबर २०२२ पासून संबंधित ठेकेदाराने सागरी महामार्ग साफसफाईच्या कामात सुरुवात केली आहे, हे पाहताच युवासेनेमार्फत काम सुरू केले नाही तर आंदोलन करण्याची भाषा करण्यात येत आहे.
रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाल्यापासून सर्व विकासकामांना गती आली असून कामाच्या दर्जाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. भाजपाने शहरातील विकास कामांचा भाजपा नेते निलेश राणे यांच्यामार्फत सक्षम पाठपुरावा चालवला असून मालवण शहरासाठी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर करून दिला आहे. असे असताना फक्त कामाचे श्रेय घेण्यासाठी पत्रकबाजी न करता हे काम आपण सत्तेत असतानाच मंजूर झालेले होते, मग या कामासाठी का चालढकल केली जात होती याची पण स्पष्टता ठाकरे सेनेने करणे आवश्यक आहे. विकास कामासाठी कायम भाजप कटिबद्ध आहे याची प्रचिती थोड्या दिवसात विरोधकांना येईल, असे श्री. बादेकर यांनी म्हटले आहे.