देऊळवाडा ते कोळंब सागरी महामार्गाची डागडुजी न झाल्यास ३ जानेवारीला रास्तारोको…
युवासेना शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांचा सा. बां. विभागाला इशारा
मालवण : शहरातील देऊळवाडा- कोळंब या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया होऊनही हे काम सुरु न झाल्याने युवा सेनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या दोन दिवसात या कामाबाबत कार्यवाही न झाल्यास नागरिकांसह रास्तारोको करण्याचा इशारा युवासेनेचे शाखाप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
मालवण शहरातील देऊळवाडा पुल ते कोळंब पुल या सागरी महामार्गची पूर्ण दुरावस्था झाली असून मार्ग खड्डेमय व धोकादायक बनला आहे. येथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. मात्र या रस्त्याची डागडुजी डांबरीकरण करण्याची कार्यवाही बांधकाम विभागाकडून होत नाही. टेंडर प्रक्रिया होऊनही कामास दिरंगाई होत आहे. याचा त्रास नागरिक व वाहनचालक यांना सहन करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन दिवसात याबाबत कार्यवाही करावी. अन्यथा ३ जानेवारी रोजी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असे सिद्धेश उमेश मांजरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग शहरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.