हरी खोबरेकर यांना धक्का ; वायरी भूतनाथ उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव

भाजपच्या पाठींब्यावर काँग्रेसच्या प्राची माणगांवकर उपसरपंचपदी विराजमान

मतदार संघातून कोणाचा सुपडा साफ झाला याचे आत्मपरीक्षण करा : भाई मांजरेकर यांचा खोबरेकरांना सल्ला

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वायरी भूतानाथ ग्रा. पं. च्या उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. या ठिकाणी उपसरपंच निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार चंदना प्रभू यांना पराभव पत्करावा लागला असून भाजपच्या मदतीने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सौ. प्राची पराग माणगांवकर या ६ विरुद्ध ४ मतांनी विजयी झाल्या आहेत. हा पराभव शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना धक्का मानला जात आहे. निवडीनंतर भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या गावातील वायरी भूतनाथ ग्रा. पं. ची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. येथील शिवसेनेच्या विद्यमान सरपंच, उपसरपंचांना भाजपने आपल्या कडे घेतले होते. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली होती. मात्र या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस पुरस्कृत पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार भगवान लुडबे यांनी भाजप उमेदवार मुन्ना झाड यांचा पराभव केला. तर ग्रा. पं. मध्येही महाविकास आघाडीच्या ५ तर भाजपच्या ४ जागा निवडून आल्या. आज नवनिर्वाचित सरपंच भगवान लुडबे यांनी पदभार स्वीकारला. तर याचवेळी उपसरपंच निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने या ग्रा. पं. वर महाविकास आघाडीचा उपसरपंच बसणार हे निश्चित झाले होते.

महाविकास आघाडीत नाट्यमय घडामोडी

महाविकास आघाडीच्या वतीने उपसरपंच पदासाठी शिवसेनेच्या चंदना प्रभू यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. याचवेळी नाट्यमय घडामोडी होऊन भाजपच्या पाठींब्यावर काँग्रेसच्या प्राची माणगावकर यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या मतदानात काँग्रेसच्या प्राची माणगांवकर यांना ६ तर शिवसेनेच्या चंदना प्रभू यांना ४ मते मिळाली. सौ. माणगांवकर यांना स्वतः बरोबरच काँग्रेसच्या ममता तळगावकर आणि भाजपच्या संजय लुडबे, पांडुरंग मायनाक, विकास मसुरकर, प्रतीक्षा केळूसकर यांची मते मिळाली. तर शिवसेनेच्या प्रभू यांना स्वतः बरोबर सरपंच भगवान लुडबे, तेजस लुडबे, गौरी जोशी यांची मते मिळाली.

हरी खोबरेकर यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ : भाई मांजरेकर

किनारपट्टी भागात भाजपचा सुपडा साफ झाल्याचं वक्तव्य करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्ते भाई मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. आजचा पराभव हरी खोबरेकर यांच्या मनमानी कारभाराचा पराभव आहे. त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून वायरी गावच्या सरपंच, उपसरपंचांनी भाजप मध्ये प्रवेश केला. आजही त्यांच्या मनमानीपणाला कंटाळून काँग्रेसचे ग्रा. पं. सदस्य भाजपा सोबत आले आहेत. भाजपचा सुपडा साफ झाल्याचे म्हणणाऱ्या खोबरेकर यांच्या पक्षाचा त्यांच्या जि. प. मतदार संघात सुपडा साफ होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मतदार संघातील चौके, आमडोस, नांदरुख या तीन ग्रा. पं. वर गावपॅनल ची सत्ता आली आहे. तर तारकर्ली, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ या ग्रा. पं. भाजपाकडे आल्या आहेत. देवबाग ग्रा. पं. शिंदे गटाकडे गेली आहे. त्यामुळे केवळ वायरी भूतनाथ या एकाच ग्रा. पं. वर शिवसेना ठाकरे गटाचा सरपंच बसला असून येथील निवडणुकीतही हरी खोबरेकर यांच्या वॉर्डात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा भाजपाला जास्त मते मिळाली आहेत. भगवान लुडबे हे स्वतःच्या वॉर्डातील समाज बांधवांच्या पाठींब्यावर निवडून आले असून येथील विजयाचे श्रेय शिवसेना अगर हरी खोबरेकर यांनी घेणे अनुचित आहे, असे भाई मांजरेकर यांनी म्हटले आहे.

उपसरपंच निवडणुकीत भाजपच्या मदतीने काँग्रेसचा विजय झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, आप्पा चव्हाण, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, भाई मांजरेकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, मुन्ना झाड, संदेश तळगावकर, महेश लुडबे, बबन गावकर, गणेश सातार्डेकर, विकी लोकेगावकर, प्रतिक लुडबे, प्रथमेश गोसावी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!