सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ वेंगुर्ले मधील “त्या” १५ गाळेधारकांच्या पाठीशी !
७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लिलावा संदर्भात केलंय हे आवाहन
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले नगरपालिकेने पुनर्बांधणी केलेल्या मासळी बाजारातील व्यापारी गाळे हे मुळच्या मासळी बाजारात व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांनाच मिळाले पाहिजेत, यासाठी संबंधित गाळे धारकांच्या सोबत तालुका व्यापारी संघटना करीत असलेल्या प्रयत्नांना व्यापारी महासंघांने सर्वतोपरी पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या दुकान गाळ्यांच्या ई- लिलाव प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणाही अन्य व्यापारी बांधवानी सहभागी होऊन बोली लावू नये. व त्याठिकाणी मागील ३० ते ४० वर्षांपासून तिथे व्यापार करणाऱ्या आपल्याच स्थानिक व्यापारी बंधुभगिनींचा जगण्याचा हक्क (राईट टू सर्व्हाइव्ह) प्रस्थापित करण्यास सहकार्य6 करावे, असे आवाहन जिल्हा महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केलं आहे.
याबाबत वेंगुर्ले तालुका व्यापारी- व्यावसायिक संघटनेने घेतलेली भुमिका योग्य आहे. मुळात पाच वर्षांपुर्वी मासळी बाजाराची इमारत पाडताना या गाळेधारकांची तात्पुरती सोय न. प.ने करून द्यावी, यासाठी वेंगुर्ले व्यापारी संघाने प्रचंड परिश्रम घेऊन त्या १५ व्यापारी बांधवांची रोजी रोटी सुरू ठेवण्यात महत्वाचे योगदान दिले होते. त्यामुळेच वेंगुर्ले न. प. या गाळेधारकांना पर्यायी जागा देऊन बाजाराच्या इमारतीची पुनर्बांधणी होताच त्यांचे पुनर्प्रस्थापन मुळ जागेवर करण्यास राजी झाली होती. तत्कालीन पालकमंत्री, नगराध्यक्ष, गाळेधारक, तालुका व्यापारी संघ व महासंघ अशा सर्वांच्या सहमतीने पुन्हा जागा देण्याच्या बोलीवर गाळेधारकांनी मुळ जागा मोकळी करून दिली आहे, याकडे लक्ष वेधून ७ सप्टेंबरच्या ई लिलाव मध्ये कोणीही अन्य व्यापारी अथवा नागरिकानी सहभागी होऊ नये, असे आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने प्रसाद पारकर यांनी केले आहे.