… तर तेच त्रास तुम्हालाही भोगावे लागतील ; नियम सर्वांनाच सारखे !

आ. वैभव नाईक यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा ; मालवणात शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार

तुमच्या विजयात सर्वांचा हातभार, याची जाणीव ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता पक्षाशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला

शिवसेनेच्या सरपंचांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देणार ; वैभव नाईकांची घोषणा ; तातडीचा ५ लाख आमदार निधी जाहीर

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडून आलेल्या सरपंचांना प्रलोभने दाखवली जात आहेत. काही ठिकाणी धमक्या देखील दिल्या जात असून नियम सर्वांना सारखे आहेत, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर तेच त्रास तुमच्या कार्यकर्त्यांना देखील सहन करावे लागतील, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला. मी आमदार म्हणून निवडून आलो म्हणून मला ५० – ५० कोटींच्या ऑफर येतायत. तुम्ही देखील निवडून आलात, म्हणून तुम्हाला वेगवेगळी प्रलोभने दिली जातील. पण तुमच्या विजयात अनेकांचा हातभार आहे. ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे, त्यांच्याशी प्रामाणिक राहा, असेही ते म्हणाले.

मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार आज आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते वायरी येथील आर जी चव्हाण सभागृहात करण्यात आला. यावेळी आ. नाईक बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, मंदार ओरसकर, बाळ महाभोज, शिल्पा खोत, दिपा शिंदे, बाबा सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, अरुण लाड, कमलाकर गावडे, बंडू चव्हाण, पिंट्या गावकर, विजय नेमळेकर, अमित भोगले, तपस्वी मयेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी आ. नाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी झाल्यास अनेक ऑफर येत असतात. मात्र ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे, त्याचा कधीच विश्वासघात करायचा नसतो. मलापण आमदार असल्यामुळे ५० कोटींची आणि मंत्रीपदाची ऑफर आली होती. ठाकरे कुटुंबिय आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना त्रास देण्याचे षडयंत्र सध्या राज्यात सुरू आहे. कितीही दबाव आला तरी आपण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे राहणार आहोत. मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या शक्तीवर आज आमदार बनलेलो आहे, असे सांगून निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे काय यासाठी भाई गोवेकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.

शिवसेनेच्या उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर त्रास !

ग्रा. पं. निवडणुकीत भाजपाकडून शिवसेनेच्या उमेदवारांना फोडण्यासाठी थेट वैयक्तीक पातळीवर त्रास दिला गेल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. वायंगणी सरपंच रूपेश पाटकर व सदस्य अॅड. आस्वलकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरपंच पदाच्या उमेदवारांनी आणि सदस्यांनी दबावाला बळी न पडता त्यांच्या पाठिशी स्थानिक शिवसैनिक राहिल्याने त्यांनी विरोधकांना जागा दाखवून दिली. रेवंडी, तोंडवळी याठिकाणी तर चाळू व्यावसायिकांना त्रास देण्याची धमकी देण्यात आली. कोळंब सरपंच यांना तर थेट ब्युटीपार्लर घालून देण्याचीही ऑफर देण्यात आली यातून भाजपला सत्तेची मस्ती आल्याचे दिसून येत आहे. सर्व निवडणूका पैशांच्या जोरावर जिंकू ही त्यांची मानसिकता आता मतदारांनी मोडून काढली आहे, असे ते म्हणाले.

“त्या” ग्रा. पं. ना २५ लाखांचा निधी देणार : आ. वैभव नाईक

शिवसेनेच्या ग्रा. पं. ना प्रत्येकी २५ लाख रुपये आमदार निधी देण्याची घोषणा आ. नाईक यांनी करून याची सुरुवात म्हणून आजच ५ लाख रुपये देत असल्याचे सांगितले. दरम्यान, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ज्या ग्रामपंचायती थोडक्या मतांनी गेल्या आहेत, त्याठिकाणी देखील आ. नाईक यांनी आमदार निधी देण्याची सूचना केली. तसेच शिवसेनेच्या सरपंचांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याची सूचना करून तालुकाप्रमुखांनी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी, असेही त्यांनी सांगितले.

सरपंचांनी तालुक्याचे नेतृत्व करावे : संदेश पारकर

मागील पाच ते सहा महिन्यात शिवसेनेसाठी कठीण काळ आहे. असे असतानाही आ. वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. जनतेचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मागील २५ वर्षात नारायण राणे यांनी विकासाचे कोणतेही ठोस काम केले नाही. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या दृष्टीने शिवसेनेचा विचार तळागाळात रुजवा. सरपंचांनी केवळ गावा पुरतं मर्यादित न राहता तालुक्याचे नेतृत्व करावे. जिल्ह्यात विकासाची जी कामे आहेत, ती आम्ही मार्गी लावू, असे सांगून लोकांमध्ये भांडणे लावून स्वतःची पोळी भाजण्याचे काम आजवर राणे भाजपने केल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला.

सत्कारासाठी १५ सरपंच उपस्थित !

यावेळी कांदळगाव, कोळंब, रेवंडी, असरोंडी, राठिवडे, रामगड, श्रावण, बुधवळे कुडोपी, ओवळीये, वायंगणी, बांदिवडे, तोंडवळी, तळगाव, साळेल, वायरी भूतनाथ या १५ गावच्या सरपंच, सदस्य आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य गावातील शिवसेनेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!