दांडी आवार हायमास्ट टॉवरच्या दुरुस्तीवेळी “त्या” माजी लोकप्रतिनिधीकडून खिल्ली उडवण्याचे काम !

हायमास्ट टॉवरच्या दुरुस्तीचे खरे श्रेय सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांचेच ; मच्छीमारांनी केले स्पष्ट

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील दांडी आवार येथे वर्षभर नादुरुस्त असलेल्या हायमास्ट टॉवरची दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्ती वरून श्रेयवाद रंगला आहे. ठाकरे गटाच्या माजी लोकप्रतिनिधींनी आपल्यामुळे ह्या हायमास्ट टॉवरची दुरुस्ती झाल्याचा दावा केला होता. मात्र मच्छिमार प्रतिनिधींनी बुधवारी भाजपा कार्यालयात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची भेट घेऊन या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल श्री. आचरेकर आणि श्री. पाटकर यांचे आभार मानले. आज श्रेय घेण्यासाठी पुढे आलेल्या एका माजी लोकप्रतिनिधी कडून हायमास्ट टॉवरची दुरुस्ती सुरु असताना खिल्ली उडवण्याचे काम सुरु होते, असा आरोप मत्स्य व्यवसायिक विली डिसोजा, विकी चोपडेकर यांनी केला आहे.

मालवण शहरातील दांडी मासळी लिलाव या ठिकाणी असलेला हायमास्ट टॉवर गेले वर्षभर बंद होता. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्या स्तरावरून तसेच प्रशासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही पूर्ण करून बंद हायमास्टची दुरुस्ती तात्काळ करून घेत हायमास्ट टॉवर प्रकाशमान केला आहे. मात्र हायमास्ट दुरुस्ती ज्यांना शक्य झाली नाही त्या एका माजी लोकप्रतिनिधीने हायमास्ट काम सुरू असताना खिल्ली उडवण्याचे काम मात्र केले, असे या मच्छीमार प्रतिनिधींनी स्पष्ट केले. यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर, मोहन वराडकर आदी उपस्थित होते.

आम्ही जनसेवक आहोत. नागरिकांची कामे पूर्ण करणे हे प्रत्येक जनसेवकाचे काम आहे. मात्र काही जण केवळ फुकाचेच श्रेय घेण्यात धन्यता मानतात. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेतात. तेव्हा त्यांची कीव येते. येथील मच्छीमार, महिला मच्छिमार, मत्स्य विक्रेते, मत्स्य एजंट यांना बंद हायमास्ट अभावी निर्माण होणाऱ्या समस्यांकडे येथील स्थानिक नगरसेवक यांनी दुर्लक्ष केले. अखेर या प्रश्नी विली डिसोजा, विकी चोपडेकर व अन्य मत्स्य विक्रेते मच्छिमार यांनी लीलाधर पराडकर यांच्या माध्यमातून माझे व दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले. त्यानंतर हायमास्ट दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घेत हायमास्ट चालू करून दिला. मात्र याचे श्रेय अन्य काहीजण घेत असल्याचे सांगत सुदेश आचरेकर यांनी आपल्या शैलीत त्यांचा समाचार घेतला. हायमास्ट टॉवरच्या दुरुस्ती कामाचे फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये. मच्छिमारांची दिशाभूल थांबवावी. अन्यथा तोंडघशी पडण्याची वेळ येईल, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!