मालवण तालुक्यात १९ ग्रा. पं. वर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच !

तालुकाप्रमुखांनी केली यादी जाहीर ; भाजपने आपल्या सरपंचांची यादी जाहीर करण्याचे आव्हान

अन्य चार ते पाच ग्रा. पं. मध्ये संख्याबळाच्या आधारावर उपसरपंच पदही ठाकरे गटाकडे

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यात झालेल्या ५५ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा १९ ग्रा. पं. वर झेंडा फडकल्याचा दावा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी या १९ सरपंचांची यादी जाहीर करीत भाजपने आपल्या सरपंचांची यादी जाहीर करावी, असे आव्हान श्री. खोबरेकर यांनी दिले आहे. तालुक्यात अन्य चार ते पाच ग्रा. पं. मध्ये आमचे उमेदवार सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्याठिकाणी आमचे सदस्य जास्त संख्येने निवडून आल्याने उपसरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य विराजमान होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अडचणीचा काळ सध्या सुरु आहे. समोर सत्ताधारी पक्ष, पालकमंत्री पद, केंद्रीय मंत्री पद तसेच धनशक्ती असलेले नेते यांच्या विरोधात सामान्य शिवसैनिकांचा हा लढा होता, ह्या लढ्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे सांगून आमच्यावर विश्वास दाखवलेल्या ग्रा. पं. सह तालुक्यातील सर्व ६५ ही ग्रामपंचायतींच्या विकासासाठी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटीबद्ध असेल, असे ते म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालूका कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, मंदार ओरसकर, नंदू गवंडी, विजय नेमळेकर, सिद्धार्थ जाधव, नरेश हुले, सन्मेश परब, शिल्पा खोत, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, कोळंब सरपंच सिया धुरी, रेवंडी सरपंच अमोल वस्त, दीपा शिंदे, गौरव वेर्लेकर, निखिल नेमळेकर, यशवंत गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी श्री. खोबरेकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर तसेच खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या विजयाचे शिल्पकार आहेत. या सर्वांनी दिवसरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे तालुक्यात हे यश मिळाले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांबरोबरच शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, मंदार ओरसकर, सन्मेश परब, शिल्पा खोत, दीपा शिंदे यांच्यासह शहरातील अन्य पदाधिकारी, शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे तालुक्यातील १९ ग्रा. पं. वर शिवसेना उद्धव ठाकरे अडचणीचा भगवा फडकला आहे. माळगाव, हडी, किर्लोस यांसह आणखी चार ते पाच ग्रा. पं. वर आमचे सरपंच पराभूत झाले असले तरी याठिकाणी आम्ही वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे याठिकाणी आमचे उपसरपंच बसणार आहेत. भविष्यात संपूर्ण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचारांची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

“त्या” पाच ग्रा. पं. ना भाजपकडून निधी नाही

मागील वेळी ६ ग्रा. पं. च्या निवडणुकीत भाजपने ५ ठिकाणी सत्ता मिळवली. या पाच ठिकाणी भाजपने किती निधी दिला, ते जाहीर करावे, असे आव्हान हरी खोबरेकर यांनी देऊन या पाचही ग्रा. पं. ना भाजपने कोणताही निधी दिलेला नाही, असा आरोप केला.

जोपर्यंत भाई गोवेकर यांच्यासारखे नेतृत्व आमच्या पाठीशी आहे. नंदू गवंडी यांच्या सारख्या ज्येष्ठांचे आशीर्वाद सोबत आहेत, तोपर्यंत कितीही संकटे आली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपणार नाही. २०२४ मध्ये खासदार म्हणून विनायक राऊत आणि आमदार म्हणून वैभव नाईक हेच विजयी होतील, असे हरी खोबरेकर म्हणाले.

विकासकामे करूनही काही गावात पराभव

काही गावात आम्ही विकास कामे करूनही आमचे उमेदवार पराभूत झाले. देवबाग मध्ये आम्ही २५ कोटी निधी दिला. पोईप मध्ये गटाराचा प्रश्न मार्गी लावला. मालोंड गावात २० कोटींचा बंधारा बांधला. तरीही येथे पराभव झाला आहे. आमचे पदाधिकारी केलेली कामे मतदारांपर्यत नेण्यात कमी पडल्याने हा पराभव झाला आहे. मात्र येत्या काळात ताकदीने याठिकाणी आम्ही विजय मिळवू, असे हरी खोबरेकर म्हणाले.

सत्ता बदलली तरी वैभव नाईकांचा करिष्मा कायम

राज्यात अलीकडे मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातून सत्तांतर झाले. मुख्यमंत्री, पालकमंत्री बदलले. मात्र तरीही आमदार वैभव नाईक यांचा करिष्मा मतदारांवर कायम असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. विरोधकांच्या ताब्यात १५ ते २५ वर्ष असलेल्या ग्रा. पं. यंदा शिवसेना ठाकरे गटाकडे आल्या. वायरी भूतनाथ गाव नेहमीच बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिला आहे. या निवडणुकीतही याचा प्रत्यय आल्याचे श्री. खोबरेकर म्हणाले.

या ग्रा. पं. च्या सरपंचांवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

१) सिया धुरी – कोळंब
२) शुभम मठकर – रामगड
३) नम्रता मुद्राळे – श्रावण
४) गोपाळ चौकेकर – चौके
५) दिव्या धुरी – रामगड
६) संतोष पानवलकर – बुधवळे कुडोपी
७) नेहा तोंडवळकर – तोंडवळी
८) रणजित परब – कांदळगाव
९) अमोल वस्त – रेवंडी
१०) लता खोत – तळगाव
११) रंजना पडवळ – ओवळीये
१२) भगवान लुडबे – वायरी भूतनाथ
१३) अनंत पोईपकर – असरोंडी
१४) आशु मयेकर – बांदिवडे
१५) रुपेश पाटकर – वायंगणी
१६) साक्षी चव्हाण – असगणी
१७) रवींद्र साळकर – साळेल
१८) श्यामसुंदर वाक्कर – देवली
१९) सुशील परब – खोटले

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!