उपतालुकाप्रमुख प्रसाद मोरजकर यांचा शिवसेना ठाकरे गटाला “जय महाराष्ट्र”
आ. वैभव नाईकांवर केले गंभीर आरोप ; भविष्यातील राजकीय वाटचाली बाबत दिले संकेत
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख तथा मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांनी सोमवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. मोरजकर हे खासदार विनायक राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र अलीकडे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सातत्याने खासदार समर्थकांवर अन्याय केला जात असून त्यांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, असा आरोप प्रसाद मोरजकर यांनी केला आहे.
मालवण पंचायत समितीचे उपसभापती पद आणि दोन वेळा पंचायत समिती सदस्य पद भूषविलेल्या प्रसाद मोरजकर यांचे सुकळवाड विभागात मोठे प्रस्थ आहे. १९९७ मध्ये त्यांनी सुकळवाड ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले असून २००२ आणि २०१२ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले आहेत. पहिल्या टर्म मध्ये त्यांनी उपसभापती पद देखील भूषवले आहे. राणे समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रसाद मोरजकर यांनी काही वर्षांपूर्वी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. त्यांच्या पत्नी वैभवी ह्या सुकळवाड ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. अलीकडे काही महिने प्रसाद मोरजकर हे नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी त्यांनी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडे शिवसेना उपतालुकाप्रमुख आणि शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आहे. याबाबत कोकण मिररशी बोलताना प्रसाद मोरजकर यांनी आमदार वैभव नाईक आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आपल्याला सातत्याने डावलत असल्याने आपण राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माझ्या गावात आमदार, तालुकाप्रमुख येतात. पण मला याची माहिती दिली जात नाही. शाखाप्रमुखाकडे जाऊन परस्पर बैठका घेतल्या जातात. वैभव नाईक सातत्याने खासदार विनायक राऊत यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करून त्यांना पक्षातून बाहेर पडण्यास प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे माझ्या शिवाय त्यांची कुवत काय आहे, हे येत्या २० डिसेंबरला ग्रामपंचायत निकालादिवशी समजेल, असा इशारा प्रसाद मोरजकर यांनी दिला आहे.
प्रसाद मोरजकर भाजपात जाणार ?
आपल्याला माझ्या कार्यकर्त्यांसाठी काम करायचे आहे. माझ्या विभागाचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी जो पक्ष निधी देण्यास सक्षम असेल त्याच्या सोबत जाण्याचा निर्णय आपण घेणार असल्याचे प्रसाद मोरजकर म्हणाले. अद्याप कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय आपण घेतला नसला तरी ग्रामपंचायत निवडणुकीत आपण भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे सांगून एक प्रकारे भाजपा प्रवेशाचे सुतोवाच त्यांनी केले आहेत.