कणकवलीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला
चोरट्यांनी दोन फ्लॅट केले लक्ष्य ; पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान
कणकवली : कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी रात्री १ वा. च्या सुमारास उघडकीस आली. निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश पवार यांच्या फ्लॅटमधून ५ लाख २० हजार रुपये रोकड व चांदीची दोन हजार रुपयांची समई चोरीस गेली तर दुसऱ्या फ्लॅटचे मालक हरीश पुरोहीत हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या फ्लॅटमधील चोरीस गेलेला मुद्देमाल समजू शकला नव्हता. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार आर. बी. नानचे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले तर सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, कॉन्स्टेबल सचिन माने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
याठिकाणी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा मागमूस लागू शकला नव्हता. मागील काही दिवस शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कणकवलीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.