क्वालिटी कंट्रोलच्या कमिटीचा ठेकेदारासोबतच पाहणी दौरा ; पत्रकारांना पाहताच घाईगडबडीत पोबारा

हरी खोबरेकर यांची नाराजी : देवबाग येथील जिओ ट्यूबच्या बंधाऱ्याच्या पाहणीसाठी कमिटीचा दौरा

आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर कमिटी आली होती देवबागात

निकृष्ट कामाचा आरोप असलेल्या ठेकेदारा समवेत कमिटीचा दौरा का ? ग्रामस्थही संतप्त

कुणाल मांजरेकर

मालवण : देवबाग येथील जिओ ट्यूबचा बंधारा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहून गेला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर क्वालिटी कंट्रोल समितीने बुधवारी या बंधाऱ्याची पाहणी केली. मात्र या समितीने पाहणी वेळी बंधाऱ्याच्या ठेकेदाराला स्वतः सोबत आणल्याने हा दौरा वादग्रस्त ठरला आहे. ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्या ठेकेदारालाच सोबत घेऊन पाहणी का केली ? अशी विचारणा स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी केली. त्यामुळे स्थानिक जि. प. सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे देखील संतप्त झाले. त्यानंतर याठिकाणी पत्रकार दाखल झाल्याचे समजताच समितीने पाहणी बाबत कोणतीही माहिती न देता येथून पोबारा केला.

दरम्यान, या चौकशीच्या माध्यमातून जिओ ट्यूबचे काम पुन्हा व्हावे अशी मागणी समितीकडे करण्यात आली आहे. वाळू पट्टे तयार व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. याठिकाणी चार कोटीचा दगडी बंधारा मंजूर आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर हे काम हाती घेतले जाईल असे हरी खोबरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

     देवबाग येथे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्चाचे जिओ ट्यूबचे बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र काही महिन्यातच जिओ ट्यूबचे बंधारे वाहून गेल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न निर्माण झाला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विरोधकांनीही याविरोधात आवाज उठवित याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. याबाबत आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी या कामाची क्वॉलिटी कंट्रोलमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर कोकण भवन येथून क्वॉलिटी कंट्रोलची समिती बुधवारी देवबाग येथे दाखल झाली. या समितीने दिवसभरात किनारपट्टी भागात बांधलेल्या जिओ ट्यूबची पाहणी केली. या समितीत अधीक्षक अभियंता देवेंद्र सरोदे, कार्यकारी अभियंता श्री. कोकरे, उपअभियंता श्रीमती गुप्ता यांच्यासह पतन विभागाचे अधिकारी एस. जी. बोथीकर, कनिष्ठ अभियंता व्ही. आर. वसावे, पतन अभियंता एस. ए. हुणेरकर आदी सहभागी झाले होते. सायंकाळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, स्थानिक ग्रामस्थ मनोज खोबरेकर, रमेश कद्रेकर यांच्या उपस्थितीत जिओ ट्यूबच्या बंधार्‍याची पाहणी करण्यात आली. यावेळी पाहणीसाठी आलेल्या समितीसोबत संबंधित ठेकेदार का उपस्थित आहे अशी विचारणा स्थानिक ग्रामस्थ रमेश कद्रेकर यांनी केली. ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्यालाच समिती सोबत घेऊन पाहणी करत असेल तर पाहणीचा निष्कर्ष काय निघणार हे आताच दिसून येत आहे. संबंधित ठेकेदाराच्या उपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत समितीच्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. मात्र अधिकार्‍यांनी यावर बोलण्याचे टाळले. या पाहणीची माहिती घेण्यास घटनास्थळी दाखल झालेल्या पत्रकारांनाही या समितीच्या अधिकार्‍यांनी कोणतीही माहिती न देता काही क्षणातच तेथून काढता पाय घेतला. आमदारांच्या तक्रारीनुसार कोकण भवन येथील क्वॉलिटी कंट्रोलची समिती पाहणीसाठी येथे आली होती. या समितीकडून पाहणीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल अशी माहिती पतन विभागाचे स्थानिक अधिकारी एस. जी. बोथीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या तक्रारीनुसार निकृष्ट दर्जाच्या जिओ ट्यूबच्या बंधार्‍याच्या पाहणीसाठी क्वॉलिटी कंट्रोलची समिती आज येथे आली होती. त्यांनी पाहणी केली. जिओ ट्यूबच्या बंधार्‍याचे काम पुन्हा व्हावे अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. जोपर्यत चांगल्या दर्जाचे काम होत नाही तोपर्यत संबंधित ठेकेदाराचे उर्वरित बिल अदा होऊ दिले जाणार नाही. या समितीसोबत संबंधित ठेकेदार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीने ठेकेदाराला का सोबत घेतले हे त्यांनाच माहिती. मात्र चौकशीनंतर जिओ ट्यूबचे काम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!