ठाकरे सरकारने लोकांना मारून टाकायचं ठरवलंय काय ?
कोविड सेंटर बंद करण्याच्या निर्णयावर भाजप नेते निलेश राणे संतप्त
कोविड सेंटर पूर्ववत सुरू करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, अन्यथा भाजप आंदोलन छेडणार
कुणाल मांजरेकर
राज्यातील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयावर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याचं सरकार सांगतंय, तर दुसरीकडे त्यांचेच प्रशासन कोविड सेंटर बंद करत असल्याने या सरकारने लोकांना मारून टाकायचं ठरवलंय का ? असा संतप्त सवाल निलेश राणेंनी केलाय. राज्यातील कोविड सेंटर पुन्हा सुरू करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, अन्यथा भाजप आंदोलन छेडेल, असा इशारा त्यानी दिलाय.
राज्य शासनाने कोविड सेंटर बंद करून त्यामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा थांबवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २४ कोरोना केंद्र बंद करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगत आहेत की कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही, तिसरी लाट येऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला गणपती सणाच्या तोंडावर कोविड सेंटर बंद करण्याचा पराक्रम ठाकरे सरकार करतंय” असं सांगून याबाबतचा व्हिडीओ निलेश राणेंनी शेअर केलाय.