किरीट सोमय्या उद्या कणकवलीत ; या घोटाळ्यांचा करणार पाठपुरावा !
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांचा घोटाळा आणि संचयनी घोटाळ्याच्या पाठपुराव्यासाठी आपण उद्या कणकवलीत येत असल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्याना आजवर त्यांनी अडचणीत आणलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते किरीट सोमय्या यांच्या मुळे आज अडचणीत आले असून यांमुळे किरीट सोमय्या यांच्या नावाची राजकीय क्षेत्रात मोठी दहशत आहे.
अलीकडेच श्री. सोमय्या यांनी राज्यातील घोटाळेबाज टॉप ११ नेत्यांची नावं जाहीर करून त्यांच्यावर कारवाईसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ट्विट करून आपण उद्या कणकवली- सिंधुदुर्गात येणार असल्याचे म्हटले आहे. “मी उद्या कणकवली सिंधुदुर्गला अनिल परब घोटाळा आणि संचयनी इन्वस्टमेंट घोटाळा पाठपुरावा साठी आमदार नितेश राणे सोबत जाणार आहे.” असं त्यांनी या ट्विट मध्ये म्हटलं असून सिंधुदुर्गात ते कोणती भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.