कोविड सेंटर हलवण्याच्या निर्णयावर भाजप आक्रमक ; तर नगराध्यक्ष दिलासा देण्याच्या भूमिकेत !

कोविड सेंटर बंद करण्याचा घाट रद्द करा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडू : सुदेश आचरेकरांचा इशारा

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची पालकमंत्र्यांशी चर्चा : कोविड सेंटर बंद न करण्याची मागणी

कोविड सेंटरमधील रुग्णांच्या सेवेसाठी दोघा कर्मचाऱ्यांचे वेतन देऊ : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

कुणाल मांजरेकर


राज्य शासनाने शासकीय कोविड सेंटर बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद आज मालवण मध्ये उमटले. येथील कोविड केअर सेंटर कर्मचाऱ्यां अभावी बंद करण्याच्या शासनाच्या विरोधात भाजपच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली. राज्यात एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. असे असताना कोविड सेंटर बंद करून शासनाला कोरोना कमी करायचा आहे की वाढवायचा आहे ? असा सवाल भजने उपस्थित करून  अचानकपणे कोविड केअर सेंटर बंद करण्यात येत असल्याने आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका घेतली. तर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी रुग्णांना दिलासा देण्याची भूमिका घेत कोविड केअर सेंटरमधील तीन रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांचे मानधन आपण देऊ असे सांगितले. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आक्रमक होत कोविड सेंटर बंद करण्याचा घाट रद्द करा नाहीतर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला. उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी या प्रश्नी थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून कोविड सेंटर बंद न करण्याची मागणी केली. दरम्यान, भाजपनेते निलेश राणे यांनी दिलेले मानधन आणि नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पुढे केलेला सहकार्याचा हात यांमुळे डॉ. पाटील यांनी सदरच्या रुग्णांना इतरस्त्र हलविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या वादावर तात्पुरता तोडगा निघाला आहे. 


राज्य शासनाने कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील ऑक्सीजन बेड कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत ग्रामीण  रुग्णालय प्रशासनाने त्याठिकाणी उपचार सुरू असलेल्या तीघा रुग्णांच्या नातेवाईकांना कल्पना दिली.. मात्र नातेवाईकांनी रुग्णांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यास विरोध दर्शविला होता. यामुळे येथे पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. रुग्णांच्या नातेवाईकांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सदरच्या रुग्णांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करून उपचार करण्याची मागणी केली. तसेच ऑक्सीजन सेंटर असतानाही रूग्ण जिल्हा रुग्णालयात हलविण्याची आवश्यकताच काय ? असा प्रश्न उपस्थित केला. कोविड सेंटरमध्ये रूग्ण असताना सेंटर बंद करण्यात येत असल्याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी सेंटरमध्ये धाव घेत रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जबरदस्तीने याठिकाणाहून रुग्णांना हलविण्यात देणार नसल्याची भूमिका घेतली. श्री. वराडकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून कोविड केअर सेंटर बंद करण्यात येवू नये अशी मागणी केली.. याप्रसंगी भाजप गटनेते गणेश कुशे, काँग्रेसचे अरविंद मोंडकर हे देखील उपस्थित होते. शासनाने रुग्णांची काळजी घेणे आवश्यक असताना अशाप्रकारे निर्णय घेऊन रुग्णांच्या जिवीताशी खेळण्याचा प्रकार असल्याची टिका उपनगराध्यक्षांनी केली.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांचे नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते. 


नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, गणेश कुडाळकर, किसन मांजरेकर यांनी डॉ. बालाजी पाटील यांची भेट घेवून सध्या सेंटरमधील रूग्णांना त्याचठिकाणी उपचार करण्यात यावेत, अशी भूमिका घेतली. यासाठी कर्मचाऱ्यांचे मानधनही देण्याचे मान्य केले. तसेच कार्यरत असणारे कर्मचारी पुन्हा सेवेत घेण्यासाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले. याबाबत लवकरात लवकर निर्णय होणार असल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने याठिकाणी भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील याना कोविड सेंटर बंद न करण्यासाठी निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी ( छाया – गणेश गावकर )
मालवण तहसील कार्यालयात निवेदन सादर करताना सुदेश आचरेकर सोबत दिपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, पंकज पेडणेकर, मोहन वराडकर ( छाया – गणेश गावकर )

सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने याठिकाणी भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोविड ऑक्सीजन सेंटर सुरू करण्यात आले होते. आज अचानकपणे पालिकेलाही कोणतीही कल्पना न देता सदरचे सेंटर बंद करण्याचा घाट घातला जात असल्याबद्दल आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. शहरातील पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तसेच काही ग्रामीण भागातील काही रूग्ण आहेत त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये योग्यप्रकारे उपचार सुरू आहेत. या रूग्णांना खाजगी हॉस्पीटलची बिले परवडणारी नाहीत. शासनाकडून एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असताना तालुकास्तरीय व शहरस्तरीय कोविड सेंटर बंद करण्याचा घाट का घातला आहे ? हा घाट रद्द करण्यात यावा. सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी पर्यटक याठिकाणी येणार आहेत. अशा स्थितीत निर्माण असलेली आरोग्य यंत्रणा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, असेही श्री. आचरेकर म्हणाले. डॉ. बालाजी पाटील यांनी कोविंड सेंटरमध्ये चांगल्याप्रकारे सुविधा दिलेली आहे. त्यांचे अभिनंदनच आहे.. त्यांनी व्हेंटिलेटर नसताना फक्त ऑक्सीजनवर अनेकांचे जीव वाचविले आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी दिपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, ममता वराडकर, पूजा सरकारे, पूजा करलकर, भाऊ सामंत, सचिन पेडणेकर, पंकज पेडणेकर, मोहन वराडकर, जगदीश गावकर, विजय चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भाजपकडून सदरच्या घटनेची माहिती माजी खासदार निलेश राणे यांना देण्यात आली. यावेळी श्री. राणे यांनी कोविड सेंटरमधील रूग्णांची हेळसांड होवू नये आणि त्यांच्या आरोग्य सुविधा योग्यप्रकारे मिळण्यासाठी कर्मचारी वर्गाचा खर्च आपण करूया असे स्पष्ट केले. यामुळे भाजपकडून धोडी चिंदरकर आणि महेश मांजरेकर यांनी चार कर्मचाऱ्यांचे मानधन डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!