जिल्ह्यातील गणेशमूर्ती कलेला व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार
अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; कुडाळात तीन दिवशीय गणेश मूर्ती कार्यशाळेचे उदघाटन
प्रदर्शनात जिल्ह्यातील १२० मूर्तिकारांचा सहभाग ; रविवारी माजी खा. निलेश राणेंच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
कुडाळ : सिधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्ती कलेचे वेगळेपण राज्यातच नव्हे तर देशातही आहे. हे वेगळेपण व्यवसायिक स्वरूपाच्या माध्यमातून पुढे नेण्याची गरज आहे. ही कला टिकवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी कुडाळ येथे आयोजित गणेश मूर्ती कार्यशाळा प्रदर्शन मेळाव्यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ओंकार डिलक्स सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, श्री गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, सौ.नीता राणे, गणपत देसाई, समीर सावंत, मुख्य कार्यकारी प्रमोद गावडे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, ऍड राजीव कुडाळकर, उदय तावडे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सातारा, रायगड मधून गणेश मूर्तिकार उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० हजार हून अधिक गणेश मूर्ती केल्या जातात. यातून सुमारे २०० कोटीची उलाढाल होते. या कलेला व्यवसायाचे स्वरूप मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा बँकेने वाटचाल केली आहे, असे सांगितले. आमदार प्रमोद जठार म्हणाले, या कलेला राजाश्रयाची गरज आहे. गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धा या वेगळ्या विषयाला अनुसरून जिल्हा बँकेने या कलेला व्यवसायाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन जी वाटचाल केली ती अतिशय कौतूकास्पद आहे. अशा प्रकारच्या कलेच्या माध्यमातून हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे जतन केले जात आहे. आपल्या या कलेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना विविध कलांतून या जिल्ह्यात पर्यटक मोठया प्रमाणात यावेत असा संकल्प करूया, असे सांगितले.
युवराज लखमराजे यानी आपण पर्यावरण जपले पाहिजे. भविष्यात पर्यावरणाची जोपासना न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, आपण गणेश मूर्ती बनवतो त्यासाठी वापरणारा रंग हा ऑइलपेंट असतो. तो रंग बदलून ऑरगॅनिक रंग या गणेशमूर्तीसाठी वापरण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतुल काळसेकर यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा हा कौतुक करण्याचा उपक्रम आहे. पेणमध्ये पीओपीचे हब आहे तसा पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचा हब सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला पाहीजे. जिल्ह्यात गणेशशाळा ऐवजी गणपतीचा कारखाना झाल्यास व्यवसायिक स्वरूप प्राप्त होईल असे सांगितले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील १२० गणेशमूर्तिकार इको फ्रेंडली गणेशमूर्ती प्रदर्शनात सहभागी झाले आहेत, हे प्रगतीचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. आभार नवीन मालवणकर यांनी मानले.
निलेश राणेंच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १३ नोव्हेंबरला सायंकाळी ३.३० वा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील १२० मूर्तीकारांनी सहभाग नोदवला असुन जिल्ह्यातील गणेश भक्तांना १२० अप्रतिम कलाकृती पहाण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. शनिवारी १२ व १३ नोव्हेंबरला अक्षय मेस्त्री – घोडगे, सिध्देश तेली – परूळे यांना मूर्तिकारांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून गणेश भक्तांना या दोन दिवशी गणेश मूर्ती घडत असतानाचे प्रात्यक्षिक पहाता येणार आहे.