मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : महाविकास आघाडीच्या पॅनेलची मुसंडी
श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील : बाळू अंधारी यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण : कुणाल मांजरेकर
मालवण खरेदी विक्री संघाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असून या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. मालवण खरेदी विक्री संघाचा कारभार करणाऱ्या सत्तारूढ पॅनेलला या निवडणुकीत धूळ चारण्यासाठी आमच्यासह मतदारही सज्ज झाले आहेत. त्यामुळे परिवर्तन अटळ असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मताने विजयी होतील, असा विश्वास या पॅनेलचे महेश उर्फ बाळू अंधारी यांनी व्यक्त केला आहे.
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटीवर जोर देतानाच मतदारांशी संपर्क वाढविल्याने प्रचारात या पॅनेलने जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत माजी संचालक मनोज लुडबे, मनोज राऊत, सुभाष तळवडेकर हे महाविकास आघाडीतून आपले नशीब आजमावत आहेत. या पॅनेलचे नेतृत्व जिल्हा बँक संचालक आणि काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी हे करीत आहेत. राजकारणा बरोबरच समाजकारण आणि सहकाराचा दांडगा अनुभव असलेले श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचे उमेदवार निवडणूक लढवीत असल्याने या पॅनेलला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना बाळू अंधारी यांनी खरेदी विक्री संघामध्ये काम करणारे कामगार आणि संस्थेचे सभासद यांच्या हितासाठी आमचे पॅनेल कार्यरत राहणार असून संघात घडलेल्या चुकीच्या गोष्टींवर आमच्यातील माजी संचालकांनी आवाज उठविला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एकूण ही सर्व परिस्थिती संघाच्या सभासदांना ज्ञात असल्याने आमच्या पॅनेलला पाठिंबा मिळत आहे असे सांगून संघाच्या प्रत्येक मतदाराला पाच मतपत्रिका दिल्या जाणार असून एका मतपत्रिकेवर चार मते, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मतपत्रिकेला प्रत्येकी एक मत तसेच पाचव्या मतपत्रिकेला दोन मते मतदारांनी द्यावयाची असून या मतपत्रिकेवरील आंबा या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या महेश अंधारी, मनोज लुडबे, चंदन पांगे, मनोज राऊत, साक्षी लुडबे, नीना मुंबरकर, मेघनाद धुरी, सुभाष तळवडेकर, नागेश आटक या नऊ ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन श्री. अंधारी यांनी केले आहे.