धक्कादायक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फरार कर्मचाऱ्याच्या आयडी वरून पोर्टलवर खरेदीसाठी निविदा
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप ; महाविद्यालयाचे डीन “त्या” कर्मचाऱ्याच्या पाठीशी ?
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमधील एक वरिष्ठ कर्मचारी विद्यार्थी फी व तज्ज्ञ प्रशिक्षकांची एकूण ५ लाख ६० हजार रुपये रक्कम खात्यावर न भरता फरार झाला आहे. फरार असतानाही त्याच्या आयडिवरून पोर्टलवर खरेदीच्या निविदा टाकल्या जात आहेत. या ९८ विद्यार्थ्यांची फी वेळीच भरली गेलेली नाही तर त्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. याबाबत कल्पना असूनही कॉलेजचे डिन डॉ. मोरे त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत आहेत. मनसेने याबाबत सचिव व आयुक्तांकडे तक्रार केली असून त्यावर लवकरच चौकशी होईल, अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच काही राजकीय लोकप्रतिनिधी या कर्मचाऱ्याच्या पाठीशी असून त्यांच्या माध्यमातून खरेदी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. ते म्हणाले, मनसेच्यावतीने आज डिन. डॉ. मोरे यांनी भेट घेण्यात आली. किरकोळ रजेचे अर्ज घेऊन गेल्या ४ ऑक्टोबरपासून हा कर्मचारी फरार आहे. हजेरीचे मस्टर कार्यालयीन अधिक्षकांकडे नसून ते डिन यांनी स्वत:कडे ठेवलेले आहे. त्यानुसार मस्टरवर ते सीएल म्हणून रजा टाकत आहेत. हा फरार असलेला कर्मचारी जिल्ह्याबाहेर गेलेला नसून कार्यालयातील एका शिपायासोबत तो हॉटेलमध्ये ओरोस येथे जेवताना दिसून आला. याच कर्मचाऱ्याकडून खरेदी प्रक्रियादेखील सुरू आहे. सदरचा कर्मचारी गायब असताना त्याच्या आयडीवरून पोर्टलवर खरेदीची टेंडर कशी जाहिर होतात? त्याबाबत डीन काहीच कार्यवाही करत नाहीत. कार्यालयातील काही कर्मचारी रजेवर असताना डीन डॉ. मोरे हे वरिष्ठांची परवानगी न घेता स्वतःच्या अधिकारात कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करत आहेत. त्यानुसार खरेदी प्रक्रिया केली जाते. २० ऑक्टोबर, २०२२ रोजी १ कोटी ६८ लाख ४० हजार २५० रुपयांच्या नियमबाह्य निविदा भरण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे या निविदा पुर्वी निकृष्ट माल पुरवणाऱ्यांच्याच आहेत. कार्यालयात असणारे दोन टीव्ही कुठे गायब झालेत ते अधिकाऱ्यांनाही माहित नाही. कार्यालयात लावण्यासाठी असलेले राष्ट्रपुरुषांचे फोटो तसेच पडून आहेत. त्यासाठी कोण माणूस मिळत नाही. मग रात्रीच्यावेळी निविदांचे काम करायला कार्यालयाबाहेरील माणसं कशी मिळतात? डीन कार्यालयीन अधिक्षकांना कोणतीही माहिती देत नाहीत. माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेली माहिती देता येत नाही, म्हणून सांगतात. आपल्या कार्यालयातील कपाटांना कुलूप लावून हा कर्मचारी महिनाभर गायब आहे. त्याची कपाटे उघडून पंचयादी करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच तो पदभार दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडे देऊन कार्यवाहीची मागणीही केली आहे. मात्र त्याबाबतही कोणाला स्वारस्य नाही. त्यांना केवळ खरेदीतच इंटरेस्ट आहे. या साऱ्या प्रकाराबाबत मनसेने तक्रार केली आहे. यापुर्वी अडीज कोटींच्या खरेदीच्या प्रस्तावाची फाईल जप्त केलेली आहे. आता १ कोटी १८ लाखांच्या खरेदीत अनियमितता असल्याचे दिसून येत असून ही खरेदी थांबविण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे उपरकर म्हणाले.