मालवणातील महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात शहर अभियंत्या विरोधात संतापाचा सूर

अशोक सावंत, भाई मांजरेकर आक्रमक : भुजबळ यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्य अभियंत्यांचे आदेश

मालवण : व्यापारी संघाच्या प्रयत्नातून महावितरणतर्फे येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या वीज ग्राहक मेळाव्यात महावितरणचे शहर कनिष्ठ अभियंता श्री. भुजबळ यांच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक यांनी, भाई मांजरेकर यांनी भुजबळ यांची तत्काळ बदली करण्याची मागणी केली. तर अशोक सावंत यांनी थेट फोनद्वारे रत्नागिरी विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार केल्यावर त्यांनी भुजबळ यांच्या बदली बाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कणकवली विभागीय अभियंता गिरीश भगत यांना दिले.

यावेळी व्यासपीठावर महावितरणचे कणकवली विभागीय अभियंता गिरीश भगत, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, सचिव रवींद्र तळाशीलकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश प्रभुलकर, बाळू अंधारी, रत्नाकर कोळंबकर, बाबा गिरकर, अभियंता सोनाली गिरकर, कणकवली उपकार्यकारी अभियंता विलास बगडे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात मालवणचा कार्यभार असणारे उपअभियंता गणेश साखरे व शहर अभियंता श्री. भुजबळ हे उपस्थित नसल्याने अशोक सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या अधिकाऱ्यांवर मालवणची जबाबदारी आहे, ज्यांना स्थानिक वीज समस्यांची माहिती आहे तेच अधिकारी उपस्थित नसतील तर नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची सोडवणूक होणार कशी ?सगळ्या तक्रारी कागदावरच राहतात, त्या सोडविल्या जात नाहीत, त्यामुळे अधिकारी समोर आलेच पाहिजे नाहीतर मेळावा रद्द करा, अशी आक्रमक मागणी यावेळी सावंत यांनी केली. शहर अभियंता भुजबळ यांच्या कारभाराला मालवणची जनता कंटाळली आहे, भुजबळ हे फोन उचलत नाहीत, तक्रारी जाणून घेत नाहीत, त्या सोडवत नाहीत, भुजबळ हे ग्राहकांशी उद्धटपणे वागतात, असे आरोपही सावंत यांनी करत भुजबळ यांच्या निषेधाचा ठराव नोंदवून घ्यावा, त्यांची तत्काळ बदली करा अशी मागणी केली. तर भुजबळ हेच शहराची मोठी तक्रार बनले आहेत अशी टीका भाई मांजरेकर यांनी केली. ग्राहक श्री. कोळंबकर यांच्यासह बाळू अंधारी, महेश कांदळगावकर, बाबा परब यांनीही अशोक सावंत यांच्या म्हणण्याला दुजोरा देत समस्या मांडल्या. यावर विभागीय अभियंता श्री. भगत यांनी एका अधिकाऱ्या विरोधात इतक्या तक्रारी येत असतील तर त्याबाबत कारवाई होणे अपेक्षित असून त्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. मात्र यावेळी आक्रमक बनलेल्या अशोक सावंत यांनी थेट रत्नागिरी मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधत प्रश्न मांडल्यावर मुख्य अभियंत्यांनी विभागीय अभियंता श्री. भगत यांना भुजबळ यांच्या बदली बाबत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. याबाबतच अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल, असे आश्वासन यावेळी भगत यांनी दिले.

यावेळी अशोक सावंत, श्री. कोळंबकर, भाई मांजरेकर, महेश कांदळगावकर, महेश अंधारी, मुकेश बावकर, समीर म्हाडगुत, विनोद भोगावकर यांसह इतरांनी वीज विषयक विविध समस्या मांडल्या. स्थानिक अभियंता सामान्यांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत, लोकांना उत्तरे देत नाहीत, फोन उचलत नाही, अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी ग्राहक म्हणूनच बोलले पाहिजे, नागरिकांची वीज विषयक कामे झाली पाहिजेत अशी भूमिका महेश कांदळगावकर यांनी मांडली. अधिकाऱ्यांनी लोकांना सहकार्य करावे तरच लोक महावितरणला सहकार्य करतील असे श्री. अंधारी यांनी सांगितले. मुकेश बावकर यांनी उच्च विद्युत दाबामुळे आपल्या केबल व्यवसायातील लाखो रुपये किंमतीची मशीन जळून नुकसान झाले, तसेच इतर ग्राहकांचीही उपकरणे जळाली, त्याची दखल महावितरणाच्या अभियंत्यांकडून उशिराने घेतली गेली, मात्र अभियंत्यांनी चुकीची उत्तरे देऊन यात महावितरणचा दोष नसल्याचे सांगितले, अशी तक्रार मांडली. राजेंद्र धुरी यांनी उच्च दाबामुळे घरगुती उपकरणांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई महावितरण देणार का अशी विचारणा केली असता वीज भरपाई मिळू शकते, त्यासाठी अर्ज दाखल करावा असे श्री. भगत यांनी सांगितले. मात्र अर्ज दाखल करूनही तो वरिष्ठांपर्यंत पोहचत नसल्याची तक्रार धुरी यांनी केली. भाई मांजरेकर यांनी वायरी भागात वीज वाहिन्या खाली आल्या असून त्यामुळे अपघाताची शक्यता असल्याने त्या वर घेण्यात याव्यात अशी तक्रार मांडली असता श्री. भगत यांनी या तक्रारीचे तत्काळ निवारण केले. तसेच वायरी, तारकर्ली, देवबाग या भागातील वीज ट्रान्सफॉर्मरचे डीपी उघडे असून त्यांना कव्हर लावण्यात यावे अशी मागणीही मांजरेकर यांनी केली. श्री. सावंत यांनी आज घेतलेल्या तक्रारींची सोडवणूक करून महिन्याभराने या तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीची उत्तरे देण्यासाठी मेळावा आयोजित करावा अशी मागणी केली. या सर्व तक्रारी ऐकून घेत त्यांची सोडवणूक करण्यात येईल, तसेच उत्तरे देण्यासाठी मेळावा घेण्यात येईल, असे आश्वासन अभियंता श्री. भगत यांनी दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!