नितेश राणेंच्या उपस्थितीत शेतकऱ्यांकडून तक्रारींचा पाढा ; १२ नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन

हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, हे दाखवून देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार : आ. राणेंची ग्वाही

बैठकीच्या प्रारंभीच विमा कंपन्यांकडून ६.३४ कोटी मिळवून दिल्या बद्दल शेतकऱ्यांनी आ. राणे, मनीष दळवींचे मानले आभार

सिंधुदुर्ग : हवामानावर आधारित फळ भात पीक विमा योजनेत विमा कंपन्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वेळेत देत नाहीत, हवामान केंद्रांची मोजमापे सदोष आहेत, नुकसान भरपाईचे निकषही शेतकऱ्यांचेच नुकसान करणारे आहेत व शेतकऱ्यांना या विमा कंपन्या दाद देत नाहीत अशा तक्रारी जिल्हावासीय शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. या पार्श्वभूमीवर विमा कंपन्या, कृषी विद्यापीठ, शासनाचे कृषी आयुक्त कार्यालय हवामानाचे मोजमाप घेणारे स्कायमेंट या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक १२ डिसेंबरला घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देऊ अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी या बैठकीत दिली.

दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी, विमा कंपन्या, कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकऱ्यांची ६ कोटी ३४ लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ जमा झाली. त्याबद्दल सर्वच शेतकऱ्यांनी या सभेच्या सुरुवातीसच आमदार नितेश राणे व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे आभार मानले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या इतिहासातील अशी पहिली बैठक शनिवारी झाली. या बैठकीत आमदार नीतेश राणे, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बँकेचे संचालक प्रकाश बोडस, प्रकाश मोर्ये, जिल्हा कृषी अधिकारी डी एस दिवेकर, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरूण नातू, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पराग म्हसले, जिल्हा समन्वयक करिश्मा धनराज, रिलायन्स विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक अधिकारी येडवे या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील आंबा बागायतदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विमा कंपन्यांनी आपल्या सोयीचे निकष बनवले असून जिल्ह्यातील उष्णता, हवामान, वाऱ्याचा वेग, पाऊस, वादळ याबाबतचे निकष आंबा पिकासाठी भात पिकासाठी सोयीचे नाहीत. अशा निकषामुळे शेताकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेली हवामान केंद्रे ही स्कायमेट यंत्रणेकडून हाताळली जातात. येथून तापमान व हवामानाची नोंद घेतली जाते. मात्र ही हवामान केंद्रे चुकीच्या ठिकाणी व यासाठी वापरल्या गेलेल्या यंत्रणेत त्रुटी असल्याने ही यंत्रणा अद्ययावत नसल्याने योग्य हवामानाच्या नोंदी होत नाहीत व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. एका तालुक्यात हवामान मोजमापाची माहिती दिली जाते पण अन्य तालुक्यांत शेतकऱ्यांना हवामान मोजमापाची माहिती दिली जात नाही, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. ज्या भागात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन होते, त्या भागात कमी नुकसान भरपाई तर ज्या भागांत अल्प आंबा होतो, त्या भागात मोठी नुकसान भरपाई याकडेही काही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये विमा कंपनीच्या पातळीवरील व आयुक्त पातळीवरील जे प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. शासनस्तरावरील जे प्रश्न आहेत ते अधिवेशनकाळात मांडू. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, सर्वसामान्य जनतेचे आहे व हे आता सरकार बदलले आहे याची जाणीव पण सर्वसामान्यांना होईल, असे काम आपण लक्ष देऊन करू अशी ग्वाहीही आमदार नितेश राणे यांनी दिली.

बीड पॅटर्नप्रमाणे सिंधुदुर्ग पॅटर्न हवा : मनीष दळवी

बीड जिल्ह्याने फळ व पीकविम्याबाबत शासनाकडून बीड पॅटर्न मंजूर करून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईतील तफावत दूर करण्यासाठी हा बीड पॅटर्न महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व शेतकऱ्यांचा हिस्सा अशा एकूण रक्कमेतून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. बीड जिल्ह्याने विमा कंपनीचा मार्जिन मनी राखीव ठेवून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी दिली जाते. हा बीड पॅटर्न या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयीचा असून तो या जिल्ह्यांतही लागू करावा. त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावा तसेच कोकम, सुपारी यासारख्या पिकांचाही समावेश व्हावा व वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीचा ही समावेश व्हावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली. तसेच जिल्ह्यातील या फळपीक विमा बाबत शेतकऱ्यांसमोर ज्या अडचणी आहेत, त्या अभ्यासपूर्ण मांडल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!