चिपी विमानतळावरील अवाजवी भाडेवाढीकडे ना. राणेंनी वेधलं केंद्रीय नागरी उड्डयनमंत्र्यांचं लक्ष
विमानतळा वरून शासकीय नियमाप्रमाणे भाडे आकारण्याची केली मागणी
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या कारभाराबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या विमानतळावरून मुंबई विमान प्रवासासाठी सातत्याने वाढीव भाडे आकारले जात असून त्यामुळे प्रवासी विमान प्रवासासाठी चिपी ऐवजी गोव्याचा आधार घेत आहेत. त्यामुळे भविष्यात चिपी विमानतळावर परिणाम होणार आहे. तरी यामध्ये आपण स्वतः हस्तक्षेप करून चिपी विमानतळावरून सरकारी नियमानुसार वाजवी विमान भाडे आकारण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ना. राणे यांनी केली आहे.
चिपी विमानतळाच्या भाडेवाढीचा मुद्दा सध्या प्रवासी वर्गाला भेडसावत आहे. जास्त विमान प्रवासासाठी जादा भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून या गंभीर समस्ये कडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांचे लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. सिंधुदुर्ग हे कोकणातील एक उदयोन्मुख पर्यटन स्थळ आहे. मात्र येथील विमान भाड्यात असाधारण दरवाढ झाल्यामुळे परिसरातील पर्यटकांच्या प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. चिपी विमानतळापासून १२२ किमी अंतरावर असलेल्या गोवा विमानतळावर स्वस्त विमान भाड्याने वारंवार उड्डाणे होत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिसरातील पर्यटक आणि स्थानिक लोकांना चिपी विमानतळाऐवजी गोवा विमानतळावरून विमान पकडावे लागत आहे. यामुळे चिपी विमानतळावर येणाऱ्या विमानांमध्ये प्रवाशांची कमतरता जाणवून येत आहे. यातून विमान कंपन्यांची सेवा बंद होऊ शकते. सध्या या विमानतळावरून फक्त एकच विमानसेवा कार्यरत आहे. आणि ही सेवा खंडित केल्यास स्थानिक प्रवाशांना त्रास तर होऊ शकतोच शिवाय पर्यटन क्षेत्रालाही धक्का बसू शकतो. त्यामुळे या प्रकरणात आपण स्वतः हस्तक्षेप करून संबंधित प्राधिकरणाला विमान भाडे सरकारी धोरणानुसार वाजवी ठेवण्याची सूचना करावी. यातून प्रवाशी संख्येत देखील वाढ होणार असल्याचे ना. राणे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.