आ. वैभव नाईक यांनी घेतली बंदर विकास मंत्री दादाजी भुसेंची भेट
मालवण बंदर जेटीच्या उदघाटनासह विविध विकास कामांकडे वेधले लक्ष
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी बंदर विकास मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत बंदर विभागातर्फे उभारण्यात आलेल्या मालवण बंदर जेटीचे अधिकृत उदघाटन करण्याची मागणी केली. त्याचबरोबर मालवण तालुक्यातील देवबाग संगम येथील साचलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी व देवबाग संगम येथे जेट्टी व त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली. त्यावर ना. दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंदर विकास विभागामार्फत देवबाग पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले.
मालवण येथे नवीन जेटी उभारण्यात आली आहे.मात्र त्याचे अधिकृत उद्घाटन झालेले नाही. जुनी जेटी जीर्ण झाली असुन त्याठिकाणी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नवीन जेटीचे अधिकृत उद्घाटन करून किल्ले प्रवाशांसाठी जेटी खुली करावी अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी ना.भुसे यांच्याकडे केली. किल्ले प्रवासी वाहतूकदारांच्या अडचणी बाबत व देवबाग च्या पर्यटन विकासाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार सैनी, परिवहन सचिव आशिषकुमार सिंग, मेरीटाईम बोर्डचे श्री. बडये उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबाग संगम हे पर्यटनदृष्ट्या लोकप्रिय ठिकाण आहे. सदर देवबाग संगम हे ठिकाण साहसी सागरी जलक्रिडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. परंतू गेल्या दोन वर्षात आलेल्या वादळांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणत गाळ साचला आहे.त्यामुळे या ठिकाणी आपल्या विभागामार्फत ड्रेनेज लाऊन गाळ उपसा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन मध्ये निधीची तरतूद करणेत यावी.तसेच, देवबाग संगम या ठिकाणी साहसी जलक्रिडा करीता असलेली जेट्टी व त्याकरीता असलेल्या सुविधा निर्माण करण्याकरीता देखील हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.