उदंड… उत्स्फूर्त… अतिभव्य… मालवण मधील नरकासुर स्पर्धेला “न भूतो, न भविष्यति” प्रतिसाद !
सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन ; रसिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते “ओव्हर फ्लो”
पुढील वर्षी अधिक भव्य दिव्य स्वरूपात इकोफ्रेंडली धर्तीवरच स्पर्धेचे आयोजन : सौरभ ताम्हणकर यांची घोषणा
मालवण | कुणाल मांजरेकर
गोव्याच्या धर्तीवर मालवण शहरात अलीकडे नरक चतुर्दशी निमित्ताने विविध मंडळांमध्ये मोठमोठे आणि आकर्षक नरकासुर साकारले जातात. त्यानिमित्ताने पर्यावरण संतुलन राखतानाच या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी येथील सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली
नरकासुर स्पर्धेला रसिकांचा ” न भूतो, न भविष्यती” असा प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे भरड नाक्यावरील रस्ते “ओव्हर फ्लो” झाल्याचे पाहायला मिळाले. हजारो नागरिकांच्या प्रतिसादामुळे ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली. भरड तारकर्ली नाक्यावर ही स्पर्धा घेण्यात आली. लहान गट आणि खुल्या गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये मंडळानी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. खुल्या गटात यंगस्टार बॉईज शिवजयंती उत्सव मंडळ वायरी तर लहान मुलांच्या गटात वरद सापळे याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. स्पर्धक आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून पूढील वर्षी इको फ्रेंडली धर्तीवरच अधिक भव्य दिव्य प्रमाणात स्पर्धा घेण्याचे मुख्य आयोजक सौरभ ताम्हणकर यांनी जाहीर केले.
नरकासुर स्पर्धा म्हटली की समोर येत ते गोवा… गोव्यामध्ये नरकासुर स्पर्धेचा मोठा इव्हेन्ट पाहायला मिळतो. मात्र आता कोकणातही मोठमोठे नरकासुर दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण मध्ये भाजपचे स्थानिक युवा नेते तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने इको फ्रेंडली धर्तीवर नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने रविवारी मध्यरात्री मालवण मध्ये नरकासुर स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. अगदी १ फुटा पासून १५ फुटापर्यंतचे नरकासुर या स्पर्धेत साकारण्यात आले होते. पर्यावरणाचं संतुलन आज काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळून तयार केलेले नरकासुर यावेळी पाहायला मिळाले. काही मंडळानी तर देखाव्यासह हालते नरकासुर तयार केले होते. यामध्ये बच्चे कंपनी देखील मागे नव्हती. बच्चे कंपनीने देखील आकर्षक नरकासुर तयार केले होते. रात्रभर हा जल्लोष करून नरकासुराची धिंड काढली जात होती.
यंगस्टार बॉईज वायरी आणि वरद सापळे प्रथम क्रमांकाचे मानकरी
या स्पर्धेला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गटात ९ तर खुल्या गटात १० मंडळानी सहभाव्ग घेतला. अनेक मंडळानी विविध क्लुप्त्या वापरून आकर्षकरित्या नरकासुर साकारले होते. तर काही मंडळानी हालते देखावे सादर केले. या स्पर्धेत मोठ्या गटात यंगस्टार बॉईज शिवजयंती उत्सव मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. तर इस्वटी महापुरुष देऊळवाडा मंडळाने द्वितीय आणि बांगीवाडा मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या मंडळांना अनुक्रमे ८८८८ /-, ४४४४/- आणि २२२२/- रुपये चषक देण्यात आला. तर लहान गटात वरद सापळे याने प्रथम आणि पार्थ नार्वेकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे २२२२/., ११११/- रुपये आणि चषक देण्यात आला. लहान गटातील सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक संजय केळूसकर, मिरा पराडकर यांच्यासह प्रख्यात युट्यूबर अंकिता वालावलकर आणि मंदार शेटये यांनी केले. सुत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बबन शिंदे यांनी स्पर्धेला विशेष उपस्थिती दर्शवली.
सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने पहिल्याच वर्षी घेतलेल्या या स्पर्धेला मंडळांचा आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सौरभ ताम्हणकर यांच्यासह राकेश सावंत, निशय पालेकर, चंद्रकांत मयेकर, ललित चव्हाण, फ्रान्सिस फर्नाडिस, जयेंद्र कळंगूटकर, तुषार वाघ, गौरव लुडबे, प्रशांत गवंडी, चिन्मय ढोलम, निनाद बादेकर, पंकज गावडे, राहुल हरचकर, शुभम लुडबे, मयू पारकर, निकीत वराडकर आदींनी परिश्रम घेतले.
पुढील वर्षी अधिक भव्य दिव्य आयोजन
गोव्या प्रमाणेच मालवण मध्ये मोठमोठे नरकासुर बनवले जातात. या कलेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. आज पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे. त्यामुळे इको फ्रेंडली नरकासुर स्पर्धा आयोजित करून पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. याला मंडळानी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही मंडळानी आकर्षक नरकासुर बनवले होते. मात्र त्यामध्ये प्लास्टिक, फोम, थर्माकोलचा वापर असल्याने ते विजेते ठरले नाहीत. मात्र पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक भव्य दिव्य स्वरूपात साकारताना सहभागी मंडळानी पर्यावरण पूरक साहित्य वापरून हे नरकासुर बनवावेत, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांचा हातभार लागला, त्यांचे तसेच सहभागी मंडळे, प्रेक्षक आणि पोलीस प्रशासनाचे आम्ही ऋणी आहोत.
सौरभ ताम्हणकर – आयोजक
“जोगेश्वरी बिट्स” ची रंगत !
यंदाच्या नरकासुर मिरवणुकीत वैशिष्ट्य ठरला तो मुंबईतील प्रसिद्ध जोगेश्वरी बिट्स चा बेंजो. बसस्थानक परिसरात नरकासुर मिरवणुकी साठी स्थानिक युवकांनी हा प्रसिद्ध बेंजो आणला होता. त्यामुळे बस स्थानक परिसरात देखील मोठी गर्दी झाली होती.