कोळंब स्मशानभूमी शेड नादुरुस्त ; दुरुस्तीसाठी युवक काँग्रेसची सा. बां. च्या अधिकाऱ्यांशी चर्चा
दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून किमान १५ लाखांचा निधी मंजूर करून घेण्याची मागणी
अन्यथा अंदाजपत्रक द्या, आमच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील कोळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये समुद्र किनारी कोळंब – मिर्याबांदा गावची संयुक्त स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीसाठी २०२१ मध्ये विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी पाच लाखाचा निधी दिला. त्यानुसार कोळंब ग्रामपंचायत वतीने या स्मशानभूमी शेडचे काम करण्यात आले. परंतु खारी हवा व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने शेड तुटून कोसळली. त्यामुळे ही शेड पूर्ववत करणे गरजेचे आहे. या कामासाठी किमान १५ लाखाचा निधी आवश्यक असून जिल्हा नियोजन निधीतून हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. या कामाचे अंदाजपत्रक करून दिल्यास हा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी देखील दाखवण्यात आली आहे.
कोळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोळंब – मिर्यांबांदा गावची संयुक्त अशी स्मशानभूमी कोळंब येथे समुद्रकिनारी आहे. ही स्मशानभूमी रस्त्यापासून काहीशी खाली समुद्रालगत सखल भागात आहे या स्मशानभूमीमध्ये गेली अनेक वर्ष तात्पुरत्या स्वरूपाची पत्राशेड घालण्यात येते. सदर स्मशानभूमी जागा ही सी.आर.झेड झोन मध्ये येत असल्याने येथे काही प्रमाणात बांधकामास बंधने येतात. त्यामुळे कमी निधी वापरून केलेले काम हे हलक्या दर्जाचे होउन खारी हवा व वारा यामुळे खराब होते. सदर ठिकाणी जागेत काही प्रमाणात भराव टाकून जागेची उंची वाढवून चांगल्या दर्जाचे जाड लोखंडी खांबाचे काम अथवा आर.सी.सी खांब कायम स्वरूपी गरज म्हणून उभारून त्यावर थोड्या उंचीवर सिमेंट स्लॅब होणे गरजेचे आहे. याकरिता किमान १५ ते १८ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून वाढीव निधीतून काम केल्यास ते टिकणारे आहे. अन्यथा दर चार – पाच वर्षांनी पुन्हा ही साध्या हलक्या दर्जाची शेड कोसळून शासनाचा निधी वाया जाणार आहे व नागरिकांना पुन्हा गैरसोय होणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच महिन्यात या स्मशानभूमीसाठी वाढीव निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून घ्यावा. अथवा तुम्ही आम्हांला अंदाजपत्रक काढून पत्र द्या. आम्ही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे शिष्टमंडळाने सा. बां. च्या कनिष्ठ अभियंता स्नेहा लोखंडे यांच्याशी चर्चे दरम्यान सांगितले. येणाऱ्या वर्षातील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ववत करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे सचिव योगेश्वर कुर्ले, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश कोयंडे, जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, कोळंब बूथ अध्यक्ष केदार केळुसकर, श्री. शेलटकर, पराग माणगांवकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.