सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षक पदाचा “खेळखंडोबा” ; २४ तासात तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
राज्याच्या गृह विभागाचा अजब कारभार ; आता सौरभ कुमार अग्रवाल यांची पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती
पवन बनसोड यांच्या नियुक्ती प्रमाणेच राजेंद्र दाभाडेंच्या बदलीची स्थगितीही ठरली औटघटकेची !
कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग
राज्याच्या गृह विभागात नेमकं चाललंय काय ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सारख्या महत्वाच्या पदाचा गृह विभागाने खेळखंडोबा केल्याचा प्रकार समोर आला असून २४ तासाच्या आत पोलीस अधीक्षक पदाचे निर्णय चक्क तीन वेळा बदलण्यात आले आहेत.
राज्यातील गृह विभागाच्या २४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीण मध्ये अपर पोलीस अधीक्षक पदी कार्यरत असलेल्या पवन बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी या आदेशाला स्थगिती देत पुन्हा श्री. दाभाडे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्याचा दुसरा आदेश काढण्यात आले. त्यामुळे राजेंद्र दाभाडे हेच तूर्तास पोलीस अधिक्षक पदावर राहणार असल्याचा समज झाला असताना सायंकाळी पुन्हा श्री. दाभाडे यांच्या जागी अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची बढतीपर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. दरम्यान, श्री. दाभाडे यांना अद्याप नवीन जागी नियुक्ती देण्यात आलेली नाही. गृह विभागाने पोलीस अधिक्षक पदाबाबत मांडलेल्या या खेळ खंडोब्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.