मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : भाजप पुरस्कृत पॅनल कडून १५ जागांसाठी २२ अर्ज दाखल

१३ नोव्हेंबरला मतदान ; १५ जागांसाठी तब्बल ५७ उमेदवारी अर्ज दाखल

मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनेलने २२ उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. १५ जागांसाठी १३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सहाय्यक निबंधक कार्यालय मालवण येथे मंगळवारी सहकार विभागाचे अधिकारी अजय हिर्लेकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप पुरस्कृत पॅनलच्या वतीने एकूण २२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. संस्था मतदार संघ ६ जागांसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात राजन गावकर, प्रफुल्ल प्रभू, अभय प्रभुदेसाई, कृष्णा चव्हाण, महेश मांजरेकर, संतोष गावकर, राजेंद्र प्रभुदेसाई, चेतन मुसळे, सतीश परुळेकर, विनायक बाईत यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर व्यक्ती मतदारसंघ ४ जागांसाठी रमेश हडकर, विजय ढोलम, अशोक सावंत, संतोष गावकर, कृष्णा चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती जमाती एक जागेसाठी सुरेश चौकेकर व राजेश तांबे यांचे अर्ज आहेत. इतर मागास मधून विजय ढोलम यांचा अर्ज दाखल आहे. महिला राखीव २ जागांसाठी सरोज परब, पूजा करलकर व अमृता सावंत तर विशेष मागास प्रवर्ग एका जागेसाठी अशोक तोडणकर यांचा अर्ज दाखल आहे.

एकूण ५७ उमेदवारी अर्ज दाखल

१५ जागांसाठी निवडणूक होत असताना कोणते उमेदवारी अर्ज माघारी घेतले जाणार याकडेही लक्ष लागले आहे. तर अन्य पक्ष पॅनल व स्वतंत्र पद्धतीनेही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांची संख्या ५७ आहे. १९ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होणार आहे. तर ३ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. १३ नोव्हेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती अजय हिर्लेकर यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक व सभासद यांना सर्वोच्च सेवा देत कर्मचारी वर्गाचे हित जोपासत संचालक वर्गाची वाटचाल राहणार आहे. मागील कार्यकाळात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यात सुधारणा केली जाणार आहे. ग्राहकांच्या विश्वासावर नेहमी नफ्यात असलेला हा संघ यापुढेही अधिक नफ्यात आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. मालवण तालुक्यात मागील काही वर्षात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीने प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. त्याच धर्तीवर या निवडणुकीतही यश प्राप्त केले जाईल, असा विश्वास तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!