विधानसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपातून आरोपी निर्दोष !

२०१४ च्या कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीतील प्रकार ; आरोपीच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर यांचा युक्तिवाद

मालवण | कुणाल मांजरेकर

२०१४ च्या कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राजेंद्र भालचंद्र पराडकर (रा. पेंडूर पराड, ता. मालवण) यांची मालवण येथील मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर यांनी युक्तिवाद केला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नारायण राणे विरुद्ध शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांच्यात लढत झाली होती. यावेळी राजेंद्र पराडकर हे राणेंच्या बाजूने पेंडूर – पराड मध्ये मतदारांना पैसे वाटप करीत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार निवडणूक आयोगाचे भरारी पथक प्रमुख सीताराम यशवंत गायचोर यांनी येथे छापा टाकला. त्याचवेळी मालवण पोलीस ठाण्याच्या के.डी. पाटील आणि के.एस. पाटील यांनीही याठिकाणी छापा टाकला असता सुहासिनी वासुदेव आवळेगावकर यांनी श्री. पराडकर हे आपल्याला लिफाफ्यातून पैसे देत असल्याची जबानी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पराडकर यांना अटक करून त्यांच्यावर भादवि कलम १७१ ब, १,२, १७१ ई प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मालवण न्यायालयात खटला चालून सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी सबळ पुराव्या अभावी आणि साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती ॲड. रुपेश परुळेकर यांनी मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. हा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने आरोपी राजेंद्र पराडकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3849

Leave a Reply

error: Content is protected !!