वैभववाडी : शिवगंगा नदीत वाहून गेलेला युवक अद्यापही बेपत्ता
मालवणच्या रेस्क्यू टीम कडून शोधमोहीम सुरूच
वैभववाडी (प्रतिनिधी)
येथील शिवगंगा नदीपात्रात रविवारी आंघोळीसाठी गेलेला भुषण लाँमवेल नाईक ( वय ४०, रा. रावेत पिंपरी चिंचवड पुणे) हा युवक नदीपात्रात वाहून गेला आहे. त्याचा शोध अद्यापही सुरू असून त्याला शोधण्यासाठी सोमवारी मालवण येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. या टिमने दिवसभर भुषणचा शोध घेतला. पण अद्यापही तो आढळून आलेला नाही.
सोमवारी सकाळी तहसीलदार रामदास झळके यांच्या उपस्थितीत या टिमने शोधमोहीमेला सुरुवात केली. यावेळी मंडळ अधिकारी श्री. कदम, तलाठी श्री. बडे, पोलीस पाटील लवू रावराणे, सुरेंद्र रावराणे, रितेश सुतार आदी उपस्थित होते. भूषण नाईक नापत्ता झाल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
लोरे नं. २ बौध्दवाडी येथील नितीन नारायण पेडणेकर (वय ४०) यांच्यासमवेत भूषण हा पुण्यावरून गावी आला होता. लोरे येथील शिवगंगा नदीत नितीन, भूषण व इतर दोघेजण रविवारी नदीपात्रात आंघोळीला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने भूषण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. भूषण वाहून गेल्याची माहिती नितीन याने स्थानिक ग्रामस्थांना दिली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. रविवारी भूषण याला शोधण्यासाठी ग्रामस्थ, आपत्ती प्रशासन व पोलिस यांनी मेहनत घेतली. करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमने देखील शोधमोहिमेत सहभाग घेतला. संपूर्ण नदीपात्रात या टीमने शोधमोहीम राबविली. पण शोधण्यात त्यांना यश आले नाही. सोमवारी मालवण येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. त्या युवकाचे नातेवाईकही पुण्याहून वैभववाडीत दाखल झाले आहेत. अद्यापही तो आढळून आलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.