तुम्ही चपात्यात एक्सपर्ट आहात…? जानकी हॉटेल देतंय तुमच्या टॅलेंटला वाव !
कुंभारमाठ येथील हॉटेल जानकीच्या रौप्य महोत्सवी वर्षांपूर्तीचे औचित्य साधून पाककला स्पर्धा
पहिल्या फेरीत चपाती बनवण्याची अनोखी स्पर्धा ; हॉटेल जानकी आणि रोटरी क्लबचे आयोजन
चिंदर, हडी येथून स्पर्धेला प्रारंभ ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सर्व गावातील फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम फेरी कुंभारमाठला रंगणार
मालवण : कुणाल मांजरेकर
मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जानकी हॉटेल व रोटरी क्लब मालवण यांच्यावतीने ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आगळी वेगळी अशी चपाती बनविण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १२ मिनिटात जास्तीत जास्त चपात्या आणि एकाच आकारात बनविण्याची ही स्पर्धा आहे. चिंदर आणि हडी येथे गावपातळीवर स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. याला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जानकी हॉटेल मालवण व रोटरी क्लब मालवण यांनी जानकी हॉटेलच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगानेच जानकी हॉटेलचे मालक रो. विनय गांवकर यांच्या संकल्पनेतून मालवण तालुका ग्रामीण भाग मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिल्या फेरीमध्ये चपाती बनविण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून यातूनच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या दृष्टीकोनातून जानकी हॉटेल मालवण व रोटरी क्लब मालवण यांनी वाटचाल सुरु केली आहे.
चिंदर गावातून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या गावामध्ये २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ३ फेरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यात राजश्री राजेंद्र कोदे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर किरण कृष्णा वराडकर द्वितीय आणि श्रीम. तृप्ती एकनाथ हडकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. त्यानंतर हडी गावामध्ये दुसरी स्पर्धा घेण्यात आली. यात १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. २ फेरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सौ. निधी लक्ष्मण कावले, दिव्या दिनेश साळकर या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. तालुक्यातील नियोजित सर्व गावातील स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विजेत्या स्पर्धकांची अंतिम फेरी जानकी हॉटेल कुंभारमाठ येथे घेण्यात येणार आहे. तालुक्यातील आणि अंतिम फेरीसाठी स्पर्धेला लागणारे सर्व साहित्य जानकी हॉटेलच्या वतीने देण्यात येणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक जानकी हॉटेलचे मालक रो. विनय गावकर यांनी दिली.