मालवणच्या भरड नाक्यावरील वाहनतळ दिवाळीपूर्वी सुरु करा…
भरड परिसरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेच्या वतीने भरडनाका येथे वाहनतळ उभारण्यात येत आहे. ह्या वाहन तळाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात येणारा दिवाळी सण आणि त्या पाठोपाठ येणारा पर्यटन हंगाम याचा विचार करून दिवाळी पूर्वी हे वाहनतळ सुरु करण्याची मागणी भरड परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे. याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर आणि जिल्हा व्यापारी संघाचे सरचिटणीस नितीन वाळके यांच्या नेतृत्वाखाली भरड परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, महेंद्र म्हाडगुत, गौरव ओरसकर, मंदार ओरसकर, अमेय देसाई, गौरव वेर्लेकर, शांती पटेल, सौ. नेवाळकर, प्राची देऊलकर, पालिका अवेक्षक सुधाकर पाटकर यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहर जागतिक पर्यटन नकाशावर आले आहे. २२ ऑक्टोबर पासून दिवाळी व नाताळ ते थर्टीफर्स्ट नववर्ष स्वागत असा मिळून जोडून येणारा पर्यटन हंगाम अगदी तोडावर आहे. कोविड काळानंतर सर्व बंधन मुक्त झाल्यानंतर या हंगामाबाबत सर्व व्यापारी वर्गात प्रचंड उत्सुकता आहे. कारण कोविड पश्चात असलेली मंदी याच्या पार्श्वभूमीवर हा हंगाम व्यापारा बाबतीत जोरदार होणे अपेक्षित आहे. व त्याची गरज पण आहे. भरङ नाका हे मालवण बाजारपेठेचे प्रवेशद्वार आहे. असे जरी असले तरीही वन-वे नियम व ऐन हंगामात वाहतुकीची सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे पार्किंग बाबतीत काही कडक नियम यात भरडनाका भागातला व्यापारी वर्ग भरडला जातो. त्यामुळे पार्किंग व्यवस्था ही भरड परिसरातील व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. भरडनाका भागासाठी पालिकेचे तयार होत असणारे पार्किंग हे जरी आज पूर्णपणे तयार झालेले नसले तरीही या दोन महिन्यात त्या ठिकाणी गाड्या लागू शकतील इतकी व्यवस्था मात्र नक्कीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे भरड परिसरातील मालवण न. प. चा तयार झालेला वाहनतळ दिवाळी पुर्वी सुरू करून या भागातील व्यापाराला चालना देण्यास सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.