खोकासूरांना महाराष्ट्रातील शिवसैनिक धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत
भाई गोवेकर यांचा इशारा ; दीपक केसरकर, उदय सामंत यांचे शिवसेनेसाठी योगदान काय ?
मालवण | कुणाल मांजरेकर
लालबाग, परळसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमच्या सारख्या जुन्या शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना उभी केली. मात्र ज्या एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या आजारपणावेळी पक्षात महत्वाची जबाबदारी दिली, त्या शिंदेंच्या गद्दारीमुळे आज निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आहे. शिवसेना उभी करताना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला त्याग या खोकासुरांना समजणार नाही. या प्रकारामुळे जुन्या काळातील शिवसैनिक प्रचंड दुखावले असून त्यांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे शिवसैनिक आता पुन्हा सक्रिय होत असून या खोकसुराना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दीपक केसरकर, उदय सामंत शिवसेनेत आलेत कधी ? पक्ष संघटना उभारणीत त्यांचे योगदान काय ? असा सवाल श्री. गोवेकर यांनी केला.
माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी मंगळवारी येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार संताप व्यक्त केला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, नंदू गवंडी, अमेय देसाई, उमेश मांजरेकर, नरेश हुले, सन्मेष परब, दीपक देसाई, प्रसाद आडवलकर, महेंद्र म्हाडगूत, बंड्या सरमळकर, गौरव वेर्लेकर, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी श्री. गोवेकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या सारख्या जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेना उभी केली. बाळासाहेब यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी तेवढ्याच ताकदीने पक्ष वाढवला. मात्र आजारपणात ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीने उद्धव ठाकरे यांनी संघटनेची धुरा दिली, त्या एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करीत त्यांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिक भडकले आहेत. जो शिवसेनेच्या विरोधात गेला, तो आमच्यासाठी संपला. त्याला आम्ही मानत नाही. 1969 साली बाळासाहेब पहिल्यांदा मालवण मध्ये आले होते. तेव्हापासून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांना मानणारे शिवसैनिक आहोत. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत शिवसेनेवर बंदी आणण्याचा विचार केला नाही, मात्र ते काम शिवसेनेत जन्म घेतलेल्या गद्दारांच्या मदतीने भाजपने केले, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
वैभव नाईक यांच्यावर अन्याय सहन करणार नाही
आमदार वैभव नाईक हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे. एवढे नीच राजकारण आजपर्यंत कधी पाहिले नाही. वैभव नाईक यांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न झाला तर जुने शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. मग आमच्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, असे भाई गोवेकर म्हणाले.
तेव्हा एकनाथ शिंदे होते कुठे ?
जिल्हाप्रमुख पदाच्या कालावधीत मी आणि माझे सहकारी मुंबई, ठाणे येथे जात होतो, तेव्हा ठाण्यात आनंद दिघे यांची काही ना काही कामानिमित्त भेट होत असे. त्यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्या आजूबाजूला देखील नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना सावरण्यासाठी आनंद दिघे यांनी राजन विचारे यांचे स्थायी समिती अध्यक्ष पद एकनाथ शिंदे यांना दिले. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांचा उदय झाला. आज आनंद दिघे असते तर शिवसेनेशी गद्दारी करण्याची त्यांची हिम्मत झाली नसती, असे भाई गोवेकर म्हणाले.
प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण गोठवण्याचे पाप : हरी खोबरेकर
रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपने धनुष्यबाण गोठवण्याचे पाप केले आहे. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात केले नाही, ते पाप भाजपने मिंधे गटाच्या मदतीने केले आहे. मात्र शिवसेना, धनुष्यबाण, बाळासाहेब आणि मातोश्री आमच्या हृदयात आहे. ते कसे गोठवणार ? चिन्ह गोठवल्याने प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात धगधगती आग पेटली आहे. ही आग गद्दाराना लोकशाही च्या माध्यमातून धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.