मालवणच्या बंदर जेटीवर पर्यटन व्यावसायिकांत तुंबळ धुमश्चक्री ; दोघे गंभीर जखमी
सतीश आचरेकर, गौरव प्रभू यांच्यासह दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल
अनधिकृत स्टॉल उभारणी वरून लाठी-काठी च्या सहाय्याने हाणामारी ; अनधिकृत स्टॉलचा मुद्दा ऐरणीवर
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण बंदर जेटीवर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत स्टॉल उभारणी वरून सतीश रामचंद्र आचरेकर आणि गौरव सुरेंद्र प्रभू या पर्यटन व्यवसायिकांच्या दोन गटात लाठी काठीने तुंबळ धुमश्चक्री झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या हाणामारीत गौरव प्रभू आणि त्याचा भाऊ चंद्रकांत सुरेंद्र प्रभू हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून सतीश आचरेकर, आनंद रामचंद्र आचरेकर, गौरव प्रभू, चंद्रकांत प्रभू यांच्यासह दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मालवण बंदर जेटीवरील अनधिकृत स्टॉलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आचरेकर आणि गौरव प्रभू या पर्यटन व्यावसायिकांत जुने वाद आहेत. रविवारी दुपारी बंदर जेटीवर सतीश आचरेकर याच्या स्कुबा डायव्हिंगचा स्टॉल उभारणीच्या जागेवर गौरव प्रभू स्वतःचा स्कुबा चा स्टॉल उभारण्यासाठी बांबू लावत असताना या दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचे पर्यवसान हाणामारी मध्ये होऊन दोन्ही गटांकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये गौरव प्रभू आणि चंद्रकांत प्रभू यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आचरेकर गटाकडून मोहिनी रामचंद्र आचरेकर तर प्रभू गटाकडून गौरव प्रभू यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही बाजूंकडील प्रत्येकी ८ अशा १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.