आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचे आशीर्वाद घेऊन पालकमंत्र्यांकडून सिंधुदुर्गच्या विकासाची “मुहूर्तमेढ” !
माजी खा. निलेश राणेंसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विशेष सत्कार
सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून कामाला सुरुवात करताना देवीचे आशीर्वाद मिळाल्याने अजून ऊर्जा प्राप्त : ना. चव्हाण
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन आणि आर्शीवाद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून कामाला सुरुवात करताना देवीचे आशीर्वाद मिळाल्यावर अजून ऊर्जा प्राप्त झाली, अशी प्रतिक्रिया ना. चव्हाण यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता आल्यानंतर ना. रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पदाची नावे जाहीर करीत मालवण तालुक्याचे सुपत्र असलेल्या ना. चव्हाण यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लावली आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर ना. रवींद्र चव्हाण शुक्रवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सकाळी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेत जिल्ह्याच्या विकासाचा श्री गणेशा त्यांनी केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रगती व विकास होत असताना सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण अधिक प्रयत्नशील आहोत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी परिसरातील रखडलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी खासदार निलेश राणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
आंगणेवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध : ना. रवींद्र चव्हाण
आंगणेवाडी मंदिर परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते, पायवाटा तसेच आंगणेवाडीला जोडणारे सर्व मुख्य रस्ते खड्डेमुक्त व्हावेत. रस्ते मार्ग डांबरीकरण व नूतनीकरण व्हावेत, येथील नळपाणी योजना कार्यान्वीत व्हावी. नवीन जलस्रोत निर्माण व्हावेत. याठिकाणी भाविकांसाठी प्रशस्थ असे सुलभ शौचालय उभारणी व्हावी यासह अन्य मागण्या ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. आंगणेवाडीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्द असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बाळा आंगणे, काका आंगणे, अनंत आंगणे, बाबू आंगणे, जयंत आंगणे, दिनेश आंगणे, प्रसाद आंगणे, रघुनाथ आंगणे, दत्ता आंगणे, गणेश आंगणे, नंदू आंगणे, किशोर आंगणे, समीर आंगणे यासह अन्य ग्रामस्थ तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, निलेश तेंडुलकर, सरोज परब, महेश मांजरेकर, विकी तोरसकर, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, महेश बागवे, राजू बिड्ये, राजू प्रभुदेसाई, विक्रांत नाईक, हरीश गावकर, सौरभ ताम्हणकर, फ्रान्सिस फर्नांडीस यासह बांधकाम विभागाच्या अधिकारी अनामिका जाधव, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, पोलीस निरीक्षक विजय यादव आदी उपस्थित होते.