ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता “नारायणास्त्र” धडाडणार !
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद
कुणाल मांजरेकर
शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी मुंबईत पार पडला. ठाकरेंनी शिवतीर्था वरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाची फायरब्रँड तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई तील नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे.
शिवसेनेच्या शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. यामध्ये नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांवर देखील हल्लाबोल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची पत्रकार परिषद काही वेळात सुरु होत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत नारायण राणे विरोधकांचा कसा समाचार घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.