निलेश राणेंकडून मालवण शहर आणि तारकर्ली- देवबागात दुर्गामातेचे दर्शन !
कुडाळ – मालवणला निलेश राणेंसारखा आमदार पुन्हा लाभूदेत : ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून देवीला साकडे
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी सकाळी मालवण शहर आणि तारकर्ली, देवबाग मधील नवरात्रौत्सव मंडळाना भेटी देऊन दुर्गामातांचे दर्शन घेतले. याठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी निलेश राणेंच्या भावी वाटचाली साठी देवीच्या चरणी साकडे घालत निलेश राणेंसारखा आमदार कुडाळ, मालवणला लाभू देत, असे साकडे देवीला घातले. तसेच श्री. राणेंचा ठिक ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मालवण दौऱ्यावर आलेल्या निलेश राणे यांनी बुधवारी सकाळी शहर आणि देवबाग, तारकर्ली मधील नवरात्रौत्सव मंडळांना भेटी दिल्या. यामध्ये बाबा मोंडकर यांच्या नवरात्र उत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर बांगीवाडा आणि भरड नवरात्र उत्सव मंडळाला त्यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. याठिकाणी स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
तसेच तारकर्ली मधील रांजेश्वर नवरात्र उत्सव मंडळ, देवबाग मधील मंडळाना त्यांनी भेटी दिल्या. याठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी देवीला साकडे घातले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू बिडये, ललित चव्हाण, अवी सामंत, नारायण लुडबे, राकेश सावंत यांच्यासह स्थानिक मंडळांचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.