मालवण पालिकेच्या व्यायाम शाळेतील “त्या” साहित्याची युद्धपातळीवर दुरुस्ती !
आठवड्याभरात शहर वासियांच्या सेवेत पुन्हा दाखल होणार : मंदार केणींची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेत उपलब्ध झालेले साहित्य दुरुस्ती साठी संबंधित कंपनीकडे पाठवण्यात आले आहे. याठिकाणी युद्धपातळीवर त्याची दुरुस्ती सुरु असून आठवड्याभरात हे साहित्य पून्हा व्यायामशाळेत येऊन मालवण वासियांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली आहे.
मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेसाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून 25 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यातून व्यायाम शाळेसाठी सुसज्ज साहित्य मागवण्यात आले होते. मात्र या साहित्यात त्रुटी दिसून आल्याने आ. नाईक यांच्या सुचनेनुसार हे साहित्य दुरुस्ती साठी पुन्हा संबंधित कंपनीकडे पाठवण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने गणेश सातार्डेकर यांनी याठिकाणी भेट देऊन दुरुस्तीच्या कामाची माहिती घेतली. यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरु असून येत्या आठ दिवसात हे व्यायाम साहित्य पुन्हा मालवण नगर पालिकेतील व्यायाम शाळेत दाखल होणार असल्याचे मंदार केणी यांनी सांगितले.