क्यार चक्रीवादळ ग्रस्तांना तीन वर्षानंतर मिळणार दिलासा ; ४१७६ रापण संघांना मिळणार लाभ !
माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट ; बैठकीत सकारात्मक चर्चा
मालवण : कुणाल मांजरेकर
ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. कित्येक नौकाधारक तसेच पारंपरिक रापण संघांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र या रापण संघांना केवळ आश्वासनाव्यतिरिक्त कुठल्याही ठोस स्वरूपाची मदत मिळाली नव्हती. तब्बल तीन वर्षानंतर या रापण संघाना दिलासा मिळणार आहे.
भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या विशेष बैठकीत क्यार चक्रीवादळ नुकसान भरपाईच्या विषयात सविस्तर चर्चा झाली असून मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याच्या बाबतीत मंत्री महोदय सकारात्मक असल्याची माहिती निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या चर्चेमुळे कोकणातील मच्छिमारांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा फायदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ४१७६ रापण संघांना मिळणार आहे. एकट्या मालवण तालुक्यातील यात १९४ रापणसंघ असून गेली तीन वर्षे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.