माजी खास. निलेश राणे यांचे अज्ञान पुन्हा एकदा प्रकट ; हरी खोबरेकर यांची टीका
‘आरसे महाल’ नूतनीकरण कामाची मंजुरी व प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्येच !
मालवण : कुणाल मांजरेकर
मालवणचे शासकीय विश्रामगृह ‘आरसे महाल’ च्या नूतनीकरण कामाची मंजुरी व प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) सन २०२० मध्ये करण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आरसे महालच्या नूतनीकरण कामाची पाहणी करून स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर टिका करताना चंद्रकांत पाटील पाटील यांच्या कालावधीत ही मंजुरी मिळाल्याचे वक्तव्य करून स्वतःचे अज्ञान प्रकट केल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे.
मालवण ‘आरसे महाल’ या शासकीय विश्रामगृह कामास मंजुरी व प्रशासकीय मान्यता शासन निर्णय क्रमांक – बीडीजी-२०२०/प्र. क्र. ५१/इमारती – ३, सार्वजनिक बांधकाम विभाग, दि. २७ फेब्रुवारी, २०२० अन्वये देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० च्या पत्रान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील शासकीय विश्रामगृह इमारत दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया १८ जानेवारी २०२२ रोजी केल्यानंतर मे. प्रभू इंजिनियर्स, पिंगुळी यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. सदर बजेट २०२० अंतर्गत मंजूर कामास प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्याकरिता आमदार वैभव नाईक यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजेट अंतर्गत मंजूर कामांपैकी पहिलेच काम प्रत्यक्षात सुरू देखील करण्यात आले आहे. या दरम्यानच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सर्व प्रकिया पूर्ण झाली आहे. सदर कामाच्या मंजुरी करिता कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे शिफारस करून पाठपुरावा केल्यानंतर मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये तरतूद करून निधी मंजूर करून दिला होता. यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी निरर्थक टिका करणे टाळून स्वतःचे अज्ञान प्रकट करू नये, असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.