‘आरसे महाल’च्या नूतनीकरणाचा सा. बां. मंत्र्यांच्या हस्ते लवकरच शुभारंभ

निलेश राणेंची माहिती : वैभव नाईक रिकामटेकडा आमदार असल्याने कुठेही फोटोसेशन करत असल्याची टीका

आरसेमहाल च्या नूतनीकरणासाठी चंद्रकात दादांच्या काळातच् निविदा जाहीर : महाविकास आघाडी कालावधीत काम रखडले

मालवण : कुणाल मांजरेकर

मालवण येथील शासकीय विश्राम गृह आरसे महालच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी भेट देऊन अधिकारी वर्गाकडून आढावा घेतला. आरसे महालच्या नूतनीकरणाला चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम रखडले. आता आमदार वैभव नाईक रिकामटेकडा आमदार असल्याने कुठेही येऊन फोटो सेशन करीत आहे. प्रत्यक्षात नूतनीकरण कामाशी त्याचा काहीही संबंध नाही. लवकरच राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होईल, अशी माहिती श्री. राणे यांनी दिली.

मालवण येथील शासकीय विश्राम गृहाच्या नूतनीकरणसाठी सुमारे ३ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. ६ रूम स्वरूपात या रेस्टहाऊसचे नूतनीकरण होणार आहे. त्यासाठी परिसर सपाटीकरण काम सुरू आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी याठिकाणी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, पूजा करलकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, आनंद शिरवलकर, प्रमोद करलकर, आबा हडकर, मोहन वराडकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, योगेश घाडी यासह, निनाद बादेकर यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निलेश राणे म्हणाले, आरसे महाल नूतनीकरण अंदाजपत्रक तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात झाले. मात्र मागील सरकारच्या काळात हे काम रखडले. आता विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात या कामाला गती मिळाली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण लवकरच मालवण दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी आरसे महाल नूतनीकरण भूमिपूजन व कामाच्या प्रगती बाबत माहिती देतील.

स्थानिक आमदाराचा या नूतनीकरण कामाशी काहीही संबंध नाही. मात्र काम नसल्यासारखे कुठेही येऊन डंपरच्या बाजूला अथवा झाडाखाली उभे राहून फोटो काढण्याचे काम आमदार करत आहे. अश्या स्थितीत आम्ही मंत्री रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणी भेट देण्याची विनंती केली. त्यांनी सहमती दर्शवली आहे. लवकरच त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित होईल. अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!