अपघातग्रस्त तेलवाहू जहाजाबाबत प्रशासन सतर्क ; तज्ज्ञांची टीम २४ तास कार्यरत
प्रशासनाची आढावा बैठक संपन्न ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : प्रांताधिकारी राजमाने यांचे आवाहन
जहाजातील तेल समुद्र किनाऱ्यावर आल्यास करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिके
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : तेल वाहतूक करणारे पार्थ हे जहाज काही दिवसापूर्वी विजयदुर्ग येथे अपघातग्रस्त झाले. हे जहाज गेल्या तीन दिवसांपासून समुद्रात बुडालेल्या अवस्थेत आहे.ज्या ठिकाणी हे जहाज बुडालेले आहे त्याठिकाणी काही तज्ज्ञांची टीम २४ तास समुद्रात काम करीत आहे. अद्याप हे तेल समुद्रकिनाऱ्यावर आलेले नसून जर आलेच तर किनाऱ्यावर थेट येऊ न देता त्याला समुद्रातूनच बाहेर कसे काढता येईल आणि जर तेल किनाऱ्यावर आलेच तर त्याला कशाप्रकारे वाळूतून सुरक्षित रित्या बाहेर काढावे. या संदर्भात प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे, असे आवाहन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
तेल वाहू जहाज बुडाल्याप्रकरणी प्रशासनाची आढावा बैठक प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. यावेळी रत्नागिरी येथील भारतीय तटरक्षक दलाचे डेप्युटी कमाडंट सचिन सिंग व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने म्हणाल्या, तेल वाहतूक करणारे पार्थ जहाज हे बुडाले असून त्यामुळे जी संभाव्य आपत्ती येवू घातली आहे किंवा येवू शकते या पार्श्वभूमीवर कोस्टल गार्ड रत्नागिरीचे कमाडंट यांनी देवगड येथे भेट दिली आहे. त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्या संदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्यात किंवा कशाप्रकारे काळजी घ्यावी. या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जहाज बुडाले आहेत. त्या ठिकाणी उपाययोजना सुरु आहेत. तथापि सर्व यंत्रणांनी समुद्र किनाऱ्यालगत कदाचित तेल आले अथवा तेल येवू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रत्येक यंत्रणांचा आज आढावा घेतला आहे. तसेच रत्नागिरीचे कमाडींग अधिकारी यांनीही योग्य प्रकारे मार्गदर्शन केले आहे. तसेच प्रात्यक्षिकेही करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
तेल गळतीमुळे तेलाचा तवंग मालवण ते विजदुर्ग पर्यंत
कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार अपघातग्रस्त पार्थ जहाजातील तेल गळतीमुळे तेलाचा तवंग मालवण ते विजदुर्ग पर्यंत ७ ते ८ नॉटीकल मैल पसरलेला आहे. वेंगर्ला रॉक्सच्या दिशेने दक्षिण – पश्चिम भागात पुढे सरकत आहे. अशी माहिती कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
रत्नागिरीचे भारतीय तटरक्षक दलाचे डेप्युटी कमाडंट सचिन सिंग म्हणाले, अपघातग्रस्त झालेल्या जहाजामुळे उद्भवलेल्या सद्यस्थितीची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार यावर तज्ज्ञांची टीम कार्यरत असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यासाठी आवश्यकत्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. तेल गळतीमुळे होणारे दुष्पपरिणाम टाळता येईल. यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच याबाबतची माहिती प्रशासनाला कळविण्यात येत आहे. या संदर्भात आज आपत्ती बाबतची प्रात्यक्षिकेही प्रशासनासोबत आयोजित केली होती. संभाव्य उद्भवण्याऱ्या परिस्थितीवर मात करण्साठी भारतीय तटरक्षक दल सज्ज आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.