खळबळजनक … हुक्का पार्लर वरील छाप्यात सिंधुदुर्गातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा !

अनधिकृत हुक्का पार्लर सह विदेशी दारूचा गुत्ताही चालवत असल्याचा आरोप

कोल्हापूरातील करवीर सरनोबतवाडी येथील घटना ; एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल

मालवण | कुणाल मांजरेकर

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सरनोबतवाडी येथे अवैधरित्या सुरू असणाऱ्या द व्हाईट रॅबिट कॅफे अँड मोअर या हुक्का पार्लरवर गांधीनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अनिल चंद्रकांत व्हटकर (३७, रा. जरगनगर कोल्हापूर) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून हा अधिकारी सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. गेले दीड ते दोन महिने ते वैद्यकीय रजेवर असल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे अनधिकृतरित्या द व्हाईट रॅबिट कॅफे अँड मोअर या नावाने हुक्का पार्लर चालविला जात होता. याची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने १८ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून ३१,१८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. उर्वरित आरोपींमध्ये प्रेम रामराव भोसले, ओंकार प्रकाश पाटील, सुरज सुनील कुडचिकर, रोहित अमर सुतार, अभयसिंह उदयसिंह भोसले, प्रवीण शंकर बावचे, सिद्धराज शिवाजी तरंगे, आणि रोहित रवींद्र कांबळे यांचा समावेश आहे.

याठिकाणी विदेशी दारूचा साठाही मिळून आला आहे. आरोपी यांनी विनापरवाना बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवून स्वतःचे फायदा करिता लोकांना हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या कंपनीचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर उपलब्ध करून देऊन तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना देखील बेकायदेशीरपणे विदेशी दारू कब्जात बाळगून लोकांना ती पिण्यासाठी उपलब्ध करून देऊन दारूचा गुत्ता चालवीत असल्याचे आढळून आल्याने एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई), ६८ अन्वये तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम २००३ चे कलम ४, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टे. आकाश संभाजी पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घुले अधिक तपास करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!