जमिनीच्या वादातून गंभीर मारहाण ; भाऊ आणि पुतण्याची निर्दोष मुक्तता
संशयित आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
जमिनीच्या वादातून राजाराम मधुकर घाडीगावकर यांना लोखंडी पहारने मारून डोक्याला गंभीर दुखापत केल्या प्रकरणी त्यांचा भाऊ संशयित आरोपी संजय मधुकर घाडीगावकर (वय ६०) आणि पुतण्या शैलेश संजय घाडीगावकर (रा. आनंदव्हाळ कातवड ता. मालवण) यांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी राजाराम मधुकर घाडीगावकर हे आरोपींचे भाऊ असून आरोपींच्या जमीनीमधून जाणारी वाट बंद केल्यामुळे फिर्यादीने विचारणा केल्याच्या रागातून आरोपींनी लोखंडी पहार त्यांच्या डोक्यात मारली व काठीने मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादीचे डोक्याला गंभीर दुखापत झाली अशी तक्रार मालवण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 323, 324, 325, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसानी तपासकाम करून याप्रकरणी मालवण न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सरकार पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले होते. मात्र साक्षीदारांच्या जबाबतील विसंगती व फिर्यादीस झालेल्या विलंबाबाबत आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले..