वाढदिनाचे औचित्य साधून अनाथ वृद्धाला मिळवून दिला हक्काचा निवारा !

पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमातील वृद्धांना अन्नदान

युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्शवत उपक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय आनंद देसाई यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामजिक उपक्रमांनी साजरा झाला. बाजारपेठ येथील वृद्ध रहिवासी अरविंद रामचंद्र पोरे हे निराधार असल्याने अमेय देसाई यांनी वाढदिनाचे औचित्य साधून त्यांना आपल्या मित्र- सहकारी यांच्या सहकार्याने अणाव येथील अनाथाश्रमात भरती करून त्यांना हक्काचा निवारा मिळवून देत युवा पिढी समोर नवीन पायंडा पाडून दिला.

बाजारपेठ येथील वृद्ध रहिवासी अरविंद रामचंद्र पोरे हे एकटेच आपले जीवन व्यतीत करीत होते. ते एकेकाळी पन्हळी पत्रे, बेकरीला लागणारे ट्रे वगैरे बनवून आपला उदरनिर्वाह करीत असत. त्यांना राहण्यासाठी हक्काचा निवारा तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय राहिली नसल्याने त्यांना अमेय देसाई यांच्या पुढाकाराने आणि विश्वास कांबळी, मनोज उर्फ राजू गिरकर, शैलेश पालव, राजेश पारधी, राजा शंकरदास यांच्या सहकार्याने अणाव येथील अनाथाश्रमात भरती करून त्यांना हक्काचा निवारा मिळवून दिला. त्याच बरोबर सध्या चालू असलेल्या पितृपक्षा निमित्त आपल्या पितरांची आठवण म्हणून अनाथाश्रमातील वृद्धांना अन्नदान करून त्यांची विचारपूस करून त्यांच्या सोबत अनाथाश्रमात वाढदिवस साजरा करून अमेय देसाई आणि मित्रमंडळाने तरुण पिढीसमोर एक नवीन पायंडा घालून दिला. याप्रसंगी राजा शंकरदास, कांबळी, पालव, गणेश भिडवलकर, मनोज उर्फ राजू गिरकर, केदार देसाई, मंदार ओरसकर, उमेश हर्डीकर, दर्शन गावकर, हेमंत रामाडे, संतोष माणगावकर, वैभव मेस्त्री, वैभव खोबरेकर, करण खडपे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!