बीच क्लिनिंग ठेकेदार तुपाशी ; जनता उपाशी ! १२ महिन्यांसाठी तब्बल दीड कोटींचा ठेका !
वैभव नाईकांनी अत्याधुनिक मशीन ऐवजी मंगेरा दिला उपलब्ध करून ; भाजपच्या विजय केनवडेकर यांचा आरोप
माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी उदघाटन केलेल्या बीच क्लिनिंग मशीनवरून भाजपने टीका केली आहे. या मशीनसाठी ठेकेदाराला बारा महिन्यांसाठी तब्बल दीड कोटींचा ठेका देण्यात आला आहे. उपलब्ध झालेली मशिन जेसीबीचे आधुनिकीकरण केलेले मशिन आहे. बिच क्लिनिंग मशीन मधून वाळूतील कचरा गोळा करून एकत्र करून तो बाहेर पडला पाहिजे, अशी मशिन येथे आवश्यक असताना आधुनिक मंगाऱ्याने कचरा गोळा करणारे मशिन येथे उपलब्ध करून दिले आहे. या मशिनने ओल्या वाळूसह कचरा एकत्र होतो, पण याचे विभाजन करणे कठीण होत आहे. त्यामुळे भिक नको कुत्रे आवर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच याकामी देण्यात आलेला ठेका अवास्तव रकमेचा असून याची चौकशी करण्याची मागणी माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे की, अलीकडेच बिच क्लिनिंग मशिन सिंधुदुर्गात दाखल झाली. आमदार वैभव नाईक यांनी त्याचा शुभारंभ केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकमेव बीच क्लिनिंग मशिन पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. या बिच क्लिनिंग मशिन व ऑपरेटिंगचा ठेका एका कंपनीला दिला असुन हा एक वर्षाचा ठेका आहे. एक वर्षाने ही मशिन जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत करावयाची आहे. बारा महिन्याच्या ठेक्यासाठी एक कोटी पन्नास लाख शासनाने दिले आहेत. त्यामुळे ठेकेदार मालामाल झाला आहे. बिच क्लिनिंग मशिन बारा महिन्याचा ठेका असला तरी ती फक्त आठ महिनेच चालणार आहे. पावसाळ्याचे पाच महिने समुद्र किनारे बंद असतात. नवीन जेसीबी मशिनची किंमत ३५ लाख असून त्यासाठी डिझेल खर्च १० लाख ८०००० रुपये, ऑपरेटर पगार अडीच लाख रुपये, मशिन मेंटेनन्स आणि देखभाल खर्च २ लाख आणि
इतर खर्च २ लाख रुपये होणार आहे. त्यामुळे ठेकेदाराला महिना ७५ हजार प्रमाणे दरमहा नफा होणार आहे. सर्व खर्च ९ लाख रुपये धरला तरी वर्षाला ६० ते ६५ लाख पर्यंतच खर्च होऊ शकतो. त्यामुळे नविन बिच क्लिनिंग मशिनचा ऑपरेटींग व देखभालीचा ठेका जास्तीत जास्त ७० ते ७५ लाखापर्यंत असूनही हा ठेका दिड कोटीला देणे म्हणजे जनतेच्या पैशाला चुना लावल्या सारखा आहे. त्यामुळे आमदारानी सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या बीच क्लिनिंग मशिनचा येथे आग्रह का धरला नाही ? एक वर्षानंतर ही मशीन कोण ऑपरेट करणार, हे अद्याप जिल्हा प्रशासनालाच माहित नाही. सिंधुदुर्गातील नगरपालिका, ग्रामपंचायत यांना कचरा उचलण्यासाठी काय व्यवस्था करणार यासाठी नियोजन नाही. अशी स्थिती असताना या मशीनचे लोकार्पण करणे म्हणजे जनतेला फसवण्यासारखे आहे.
मालवण मधील नगरपालिकेला दिलेला अग्निशमक बंब “आमच्याकडे अग्निशमक गाडी आहे” हे सांगण्यासाठी उपलब्ध केला आहे. शहरात हा अग्निशामक बंब फिरू शकत नाही. त्यामुळे नियोजन न करता फक्त श्रेय लाटण्यासाठीच आमदार याचा शुभारंभ करणार का ? असा सवाल विजय केनवडेकर यांनी केला आहे.