अपघातास व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओमनी चालकाची निर्दोष मुक्तता
मृतदेह घेऊन येताना झाला होता अपघात ; आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
गोवा बांबुळी येथून मित्राच्या सासऱ्याचा मृतदेह मालवण- देवबाग येथे ओमनी वाहनातून घेऊन येत असताना गाडी उलटून झालेल्या अपघातात गाडीतील तिघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओमनी चालक सुनिल रघुनाथ मसुरकर (वय ४०, रा. शिरोडा ता. वेंगुर्ले) याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.
ओमनी चालक सुनिल रघुनाथ मसुरकर हे गाडीतून मित्राच्या वडिलांचा मृतदेह बांबुळी येथून घेऊन येत असताना वाहनाचा वेग भरधाव असल्याने ओमनी कुंभारमाठ येथे उलटली व आतमधील प्रवास करणाऱ्या तीन इसमांना दुखापती झाल्या. त्यामुळे आरोपीने हयगयीने व बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालवताना त्याचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची तक्रार २०१८ मध्ये मालवण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार आरोपीवर भारतीय दंड विधान कलम २७९,३३७, ३३८, मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसानी तपासकाम करून याप्रकरणी मे. मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सरकार पक्षाने एकूण चार साक्षीदार तपासले होते. मात्र फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.