भावाला मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता
आरोपीच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद
मालवण : कौटुंबिक वादातून भावाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपातून डिकवल येथील दाजी रघुनाथ पाताडे (वय ५०) यांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.
याबाबत संजय पाताडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 323, 324, 325, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी संजय पाताडे हा आरोपीचा भाऊ असून कौटुंबिक वादातून आरोपीने बाबूंच्या काठीने फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केली होती. त्यामधे फिर्यादीचे खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले अशी तक्रार 2020 मध्ये मालवण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसानी तपासकाम करून मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सरकार पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले होते. मात्र साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व फिर्यादीस झालेला विलंबाबाबत आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.