भाजयुमो इम्पॅक्ट : देऊळवाडा सागरी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

तात्पुरत्या स्वरूपात होणार डागडुजी ; गणेश चतुर्थी नंतर नूतनीकरण करण्याची युवा मोर्चाची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील सागरी महामार्गावरील देऊळवाडा ते कोळंब या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट भरून बुजविले आहेत. दरम्यान, गणेश चतुर्थी नंतर या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ललित चव्हाण यांनी केली आहे.

सागरी महामार्गावरील देऊळवाडा ते कोळंबपूल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये धडक देत निवेदन देत सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याची पाहणी करण्यास भाग पाडले होते. गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी दिला होता. भाजयुमोच्या या दणक्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. सिमेंटच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजविण्यात आले. तसेच या रस्त्या लगतची झाडी देखील तोडण्यात येत आहे. येत्या काळात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ललित चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3840

Leave a Reply

error: Content is protected !!