१०० ईडीएट्स ग्रुपचं आणखी एक पाऊल ; मालवणात शीतशवपेटीचं लोकार्पण

तहसीलदार अजय पाटणे यांची प्रमुख उपस्थिती ; ग्रुपच्या सामाजिक दायित्वाचे मान्यवरांकडून कौतुक

मालवण | कुणाल मांजरेकर

सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण येथील १०० ईडीएट्स ग्रुपने सामाजिक क्षेत्रात आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. शहरातील शीतशव पेटीची गरज लक्षात घेऊन ग्रुपच्या वतीने शीत शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली असून याचे लोकार्पण रविवारी तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील फोवकांडा पिंपळ येथे करण्यात आले.

मालवण ग्रामीण रुग्णालयात शीत शवपेटी उपलब्ध आहे. मात्र ह्या शवपेटीत शव असल्यास त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शीत शवपेटीची गरज भासते. त्यामुळे १०० ईडीएट्स ग्रुपने सामाजिक दायित्व म्हणून ही शीतशव पेटी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ग्रुपच्या सदस्यांनी आर्थिक हातभार लावला. याचा लोकार्पण सोहळा शहरातील फोवकांडा पिंपळ येथे रविवारी करण्यात आला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांच्यासह ग्रुपचे अडमीन सीझर डिसोझा, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. तहसीलदार अजय पाटणे यांना वाढदिवसाचे औचित्य साधून हा लोकार्पण सोहळा रविवारी करण्यात आला. गरजू व्यक्तींना अत्यल्प मोबदल्यात ही शीत शवपेटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ग्रुप अडमीन सीझर डिसोझा यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!