राजकारण गेलं चुलीत ! जुन्या शिवसैनिकांना आ. नितेश राणेंकडून “बंपर ऑफर” !!

राणेसाहेबांच्या रूपाने जुन्या शिवसैनिकाचा मोदींनी सन्मान केल्याची भावना व्यक्त

कुणाल मांजरेकर
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील विळ्या भोपळ्याचं वैर अवघा देश सध्या अनुभवतोय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना आव्हान- प्रतिआव्हान दिलं जात असताना याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंनी राजकीय हेवेदावे विसरत जुन्या शिवसैनिकांना एक बंपर ऑफर दिलीय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणेंनी ही ऑफर दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेसाहेबांचा मंत्रिमंडळात समावेश करून जुन्या शिवसैनिकाचा सन्मान केल्याने आपण हा प्रस्ताव ठेवत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. त्यामध्ये राणेंनी ठाकरेंबाबत केलेलं विधान आणि त्यानंतर ठाकरे सरकार कडून राणेंवर झालेली अटकेची कारवाई यांमुळे हे वाद अधिकच चिघळले आहेत. असं असताना स्व. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांसाठी आमदार नितेश राणे यांनी एक प्रस्ताव सादर केला आहे. मागील दोन वर्ष राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अशावेळी सर्वांचीच परिस्थिती हलाखीची बनली असून त्याला शिवसैनिक देखील अपवाद नाहीत. आम्ही राणे कुटुंबीय स्वतःला आजही बाळासाहेबांचे शिवसैनिक समजतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेसाहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री पद दिलं आहे. देशाचा ६० % जीडीपी ठरवण्यात या खात्याचा वाटा असून उद्योग निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात सबसिडीने निधी देण्याचे अधिकार या खात्याला आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या जुन्या शिवसैनिकांची परिस्थिती आम्हाला माहीत असून या शिवसैनिकांनी राजकारण बाजूला ठेवून माझ्याशी संपर्क करावा. आम्ही तुमचा विचार करू. तुमच्या मुलांना उद्योजक बनवायची जबाबदारी मी स्वतः घेतो. मला भेटणाऱ्याचे नाव गुपित ठेवलं जाईल, अशी मी खात्री देतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मुलांना उभं करायची जबाबदारी माझी आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राणेंच्या या प्रस्तावाला जुने शिवसैनिक कसा प्रतिसाद देणार, याबाबत उत्सुकता आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!