बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू
दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
आचरा पारवाडी येथील घटना ; वनविभागाने दखल घेण्याची मागणी
आचरा : आचरा पारवाडी बरोबरच वरचीवाडी येथेही बिबट्याचा वावर वाढला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आचरा वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या बाहेर चारायला सोडलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासराला मारल्याची घटना घडली आहे. भर दिवसा बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने याची तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
आचरा पारवाडी भागात एकटाच नजरेस पडणारा बिबट्या वरचीवाडी येथे दोन बछड्यांसह दिसून येत असल्याने दोन्ही ठिकाणी वेगवेगळे बिबटे असण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. यातच दोन्ही ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने रानावनात गुरे चारावयास जाणाऱ्या गुराख्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
शनिवारी आचरा कुपेरी डोंगर येथे महेंद्र आचरेकर यांनी गाईच्या वासराला चरायला सोडले होते. यावेळी बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाने तातडीने दखल घेउन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.